सांगली : मान्सून थबकला; खरीप लांबला | पुढारी

सांगली : मान्सून थबकला; खरीप लांबला

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पेरण्या लांबल्या आहेत. तसेच धरणांतील पाणीसाठा संपू लागला आहे. पावसाच्या भरवश्यावर केलेल्या पेरण्या संकटात आल्या आहेत. पुढील पंधरा दिवसांत पाऊस न पडल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यात बर्‍यापैकी पाऊस पडला होता. यामुळे पेरण्या झालेली पिके तरली होती. पण यंदा परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जून महिना संपत आला तरी मान्सूनचा ठिपूस पडलेला नाही. यामुळे पावसाच्या भरवश्यावर केलेल्या पेरण्यातून उगवलेली कोवळी पिके करपू लागली आहेत. प्रामुख्याने शिराळा तालुक्यातील भात पीक कोमेजू लागले आहे. तसेच मान्सून लांबल्याने जिल्ह्यात बहुतेक तालुक्यात पेरण्या लांबल्या आहेत. पाऊस लांबल्याने नदीकाठी टोकण केलेले सोयाबीन होरपळू लागले आहे. तसेच विविध रोग-किडींचा सोयाबीन, भुईमुगावर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

जिल्ह्यात यंदा पेरणीसाठी सरासरी क्षेत्र 284411 हेक्टर आहे. प्रत्यक्ष पेरणी 90043.2 हेक्टरवर झाली आहे. ही टक्केवारी 32 आहे. पिकनिहाय पेरणीयोग्य क्षेत्र कंसात व प्रत्यक्षात पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : भात-(16064.3 हेक्टर)-प्रत्यक्ष पेरणी : 13004 (81 टक्के), ज्वारी – (51594.5) – 291(11%), बाजरी – (55187.3) – 33302 (60%), मका – (38923.2) – 12638(32%), तूर – (8991.9) – 7051(78%), मूग – (8652.1) – 1772.9(21%), उडीद – (18660) – 9411.2 (60%), भुईमूग – (31178.7) – 3194.4 (10%), सूर्यफूल – (514.5) – 1424.3 (278 %), सोयाबीन – (46336) – 5407.5(12 %).

तसेच धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोयना, धोम, कण्हेर, चांदोली या सांगली जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या धरणांत पाणीसाठा अत्यल्प आहे. कृष्णा, वारणा नद्या वारंवार कोरड्या पडू लागल्या आहेत. सिंचनास पाणी कमी पडू लागले आहे. नदीकाठच्या ऊस, सोयाबीन, भुईमूग, केळी यासह अन्य पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. मान्सून अजूनही महिनाभर ओढ देईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्तकेला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button