जतमध्ये दिवसाढवळ्या बंद घरे फोडण्याचे सत्र | पुढारी

जतमध्ये दिवसाढवळ्या बंद घरे फोडण्याचे सत्र

जत शहर ; पुढारी वृत्तसेवा : जतमध्ये दिवसाढवळ्या बंद घरे फोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहरात आधीच रात्रीच्या चोर्‍या सुरू होत आहेत. यातच आता दिवसाढवळ्या बंद घरे फोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. दिवसा घरफोडी होत असल्याच्या प्रकारामुळे ग्रामीण भागात कमालीची भीती पसरली आहे.

ग्रामीण भागात शेतकरी कामावर अथवा शेतमजूर बाजारासाठी गेल्याचा फायदा घेऊन या घरफोड्या होत आहेत. घरावर पाळत ठेवूनच दिवसाढवळ्या घरफोडीचे प्रकार घडत आहेत.

तालुक्यातील मुचंडी, येळदरी, जत मधील आशीर्वाद गार्डन परिसर, उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाडरबोबलाद आदी ठिकाणी दिवसा घरफोडीचे प्रकार घडले आहेत. या चोर्‍या एक लाख रुपये आसपासच्या रक्कमेच्या झाल्या आहेत.

घरफोडीच्या सात ते आठ घटनानंतर व्हसपेठ येथील बाळासाहेब देसाई यांचे शेतातील घर चोरट्यांनी फोडले. यात घरातील रोख रक्कम व सोने मिळून सत्तर हजाराचा माल लंपास करण्यात आला. या घटनेची पोलिसांत उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Back to top button