सांगली : ‘सिव्हिल’ रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्‍ल! | पुढारी

सांगली : ‘सिव्हिल’ रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्‍ल!

सांगली ; सचिन लाड : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (सिव्हिल) रुग्णांच्या संख्येने ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. साडेचारशेहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांना बेड शिल्लक नसल्याने त्यांना फरशीवर झोपवून उपचार करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनाला आली आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांना बसायला जागा मिळेना, अशी सध्याची परिस्थिती आहे. महत्वाचे पाच विभाग नवीन इमारतीत हलविण्यात आले आहेत. जुन्या इमारतीला धोका असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. इमारत केव्हाही पडू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जुन्या इमारतीलमधील सर्व रुग्ण नवीन बाह्यरुग्ण इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. यामध्ये 180 रुग्णांना उपचार करण्याची क्षमता आहे. पण, क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. साडेचारशे रुग्ण उपचार घेत आहेत.
केवळ 180 बेड आहेत.

वाढत्या रुग्णाांच्या संख्येमुळे सर्वच रुग्णांना बेड देणे अशक्य होत आहे. त्यामुळे जवळपास 270 रुग्णांना फरशीवर झोपवून उपचार केले जात आहे. सलाईन लावायची म्हटले तरी लोखंडी स्टॅण्डही उपलब्ध नाहीत. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना सलाईनची हातात बाटली घेऊन उभे रहावे लागत आहे. रात्रीच्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना झोपायला जागा नाही. रुग्णाजवळ थांबणे आवश्यक असते, पण जागाच नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयाच्या आवारात रात्र बसून काढावी लागत
आहे.

प्रशासनावर नातेवाईकांचा दबाव

रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांचे नातेवाईक अनेकदा दंगा करतात. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्याशी वाद घालतात. राजकीय नेते व कार्यकर्त्यांना साकडे घालून बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. या सार्‍या प्रकारामुळे प्रशासनाला काम करणे अवघड बनले आहे. काही नातेवाईक बेड नसल्याने मग खासगी रुग्णालयाची वाट धरत आहे. पण, ज्यांची परिस्थिती हालाखीची आहे, ते मात्र आहेत्या स्थितीत उपचार घेत आहेत.

अतिदक्षता विभाग कमी पडू लागला

अनेक रुग्णांना सहा ते सात दिवस दाखल करुन उपचार करण्याची गरज असते. पण, वाढत्या रुग्णांची संख्या आणि बेड शिल्लक नसल्याने दोन-तीन दिवसांतच रुग्णांना ‘डिसचार्ज’ देण्याची प्रशासनावर वेळ आली आहे. या रुग्णांना मग दररोज तपासणीसाठी बोलविले जात आहे. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, शिराळा या लांब तालुक्यातील रुग्णांना दररोज येथे अशक्य होत आहे.

Back to top button