सांगली : राष्ट्रवादी आशावादी, भाजपमध्ये धाकधूक | पुढारी

सांगली : राष्ट्रवादी आशावादी, भाजपमध्ये धाकधूक

मांजर्डे ; विलास साळुंखे : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची पुनर्ररचना झाल्यानंतर चिंचणी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आशावादी आहे. तर भाजपाची धाकधूक वाढणार आहे. या गटात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

चिंचणी गटात आरवडे आणि चिंचणी हे गण आहेत. चिंचणी हा भाजपाचे खासदार संजय पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र नवीन रचनेमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहेत. येथे भाजप आणि राष्ट्रवादीतच अटीतटीची लढत होणार असल्याचे संकेत आहेत. मतदारसंघ पुनर्ररचनेत पूर्वीच्या मांजर्डे गटातून आरवडे, बस्तवडे आणि मणेराजुरी गटातील बलगवडे, डोर्ली, लोंढे, येळावी गटातून बेंद्री, विसापूर गटातील पुणदी गावांचा समावेश चिंचणी गटात करण्यात आला आहे. या गावातून गेल्यावेळी राष्ट्रवादीला मताधिक्क्य मिळाले होते. नव्याने समावेश केलेल्या गावांमुळे या गटात राष्ट्रवादी काँग्रेस आशावादी राहणार आहे.

मात्र भाजपासाठी धाकधूक वाढणार आहे. बालेकिल्ला कायम राखण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हा मतदारसंघ खासदार पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांचा घरचा मतदारसंघ आहे. दोन्ही पक्षांकडून आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोण उमेदवार यावरच पुढील गणिते आखली जाणार आहेत. आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चिंचणी गावालाच जास्तवेळा संधी देण्यात आली आहे. यावेळी तरी अन्य गावांना संधी मिळणार का, याची उत्सुकता लागली आहे. ऊस उत्पादक कोणाच्या पारड्यात मते टाकणार, यावर बरेच अवलंबून असणार आहे.

चिंचणी गट आणि गणांतील गावे

आरवडे, बलगवडे, बस्तवडे, भैरववाडी, डोर्ली, लोढे, पुणदी, बेंद्री, चिंचणी, मतकुणकी, वासुंबे, आरवडे पंचायत समिती गण : आरवडे, बलगवडे, बस्तवडे, भैरववाडी, डोर्ली, लोढे, पुणदी., चिंचणी गण – बेंद्री, चिंचणी, मतकुणकी, वासुंबे.

Back to top button