म्हैसाळमध्ये सामूहिक आत्महत्या; सावकारी पाशाने घेतला ९ जणांचा बळी, आठजण ताब्यात | पुढारी

म्हैसाळमध्ये सामूहिक आत्महत्या; सावकारी पाशाने घेतला ९ जणांचा बळी, आठजण ताब्यात

मिरज ः पुढारी वृत्तसेवा म्हैसाळ (ता. मिरज) येथे कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. खासगी सावकारीतून ही घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आले. आत्महत्या करण्यापूर्वी या कुटुंबाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्याआधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आठ सावकारांना ताब्यात घेतले आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. मणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), पत्नी रेखा माणिक वनमोरे (45), मुलगा माणिक आदित्य वनमोरे (15), मुलगी प्रतिभा माणिक वनमोरे (21), शिक्षक पोपट यल्लाप्पा वनमोरे (52), त्यांची पत्नी संगीता पोपट वनमोरे (48), मुलगा शुभम पोपट वनमोरे (28) आणि त्यांची मुलगी अर्चना पोपट वनमोरे (30) व आक्काताई यल्लाप्पा वनमोरे (वय 72, सर्व रा. नरवाड रस्ता, म्हैसाळ) यांचा समावेश आहे.

डॉ. माणिक वनमोरे हे खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. त्यांचे बंधू पोपट वनमोरे हे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. या दोघा भावांनी गावातील काही खासगी सावकार तसेच ओळखीतील काही जणांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची वनमोरे कुटुंबास वेळेत परतफेड करता आली नाही. त्यामुळे सावकारांसह संबंधितांनी या कुटुंबांकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. याला कंटाळून या कुटूंबाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

डॉ. माणिक हे गावात खासगी पशुवैद्यकीयचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा दहावीमध्ये व मुलगी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तर पोपट वनमोरे यांची मुलगी अर्चना ही कोल्हापूर येथील बँक ऑफ इंडियाच्या बाचणी (ता. कागल, जि. कोल्हापूर) शाखेत रोखपाल म्हणून नोकरीस होत्या. माणिक आणि पोपट या दोघांनी सावकारी पाशाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोपट यांनी त्यांची मुलगी अर्चना हिला कोल्हापूर येथून बोलावून घेतले होते. त्यानंतर दोघा भावांनी सुरुवातील कुटुंबातील इतरांना विषारी द्रव्य पाजले. त्यानंतर स्वत: विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

डॉ. माणिक हे एका गवळ्याकडून दूध घेत होते. परंतु सोमवारी ते दूध घेण्यासाठी गेले नाहीत. त्यामुळे दूध देण्यासाठी गवळी त्यांच्या घरी आला होता. परंतु उशिरापर्यंत गवळ्याने दरवाजा वाजवून देखील डॉ. माणिक यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी ही बाब डॉ. माणिक यांच्या चुलत भावाला सांगितली. चुलत भावासह नातेवाईकांनी व शेजार्‍यांनी घराबाहेर गर्दी केली. त्यांना काही जणांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉ. माणिक यांच्यासह कुटुंबातील कोणीही फोन उचचला नाही. त्यामुळे शंका आल्याने नातेवाईकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु घराचा पुढील दरवाजा बंद होता.

नातेवाईकांनी तातडीने घराच्या पाठीमागील दरवाजाकडे धाव घेतल्यानंतर दरवाजा उघडला दिसला. नातेवाईकांनी घरात प्रवेश केल्यानंतर डॉ. माणिक यांच्यासह कुटुंबातील सहाजण निचपीच पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती देण्यासाठी काही जणांनी पोपट यांना देखील फोन केला. परंतु त्यांनी देखील फोन न उचलल्याने याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पोपट यांच्या घरी पाहणी केली असता पोपट वनमोरे त्यांची पत्नी संगीता व मुलगी अर्चना यांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी डॉ. माणिक आणि पोपट यांच्या खिशात वेगवेगळी चिठ्ठी सापडली. यामध्ये काही खासगी सावकारांची नावे निष्पन्न झाली असून पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

आठजण ताब्यात

डॉ. माणिक आणि पोपट यांच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीमध्ये आठ जणांची नावे निष्पन्न होताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अजय सिंदकर, सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक पथक रवाना झाले. पथकाने म्हैसाळ, वड्डी, बेडग आणि सांगली येथील आठ सावकारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Back to top button