सांगली : जनतेच्या रेट्याने टेंभू योजना पूर्णत्वास | पुढारी

सांगली : जनतेच्या रेट्याने टेंभू योजना पूर्णत्वास

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : पाणी परिषद व जनतेच्या रेट्याने स्वप्नवत वाटणारी टेंभू योजना पूर्णत्वास गेली आणि दुष्काळी भागात पाणी आले, अशी भावना हुतात्मा समूहाचे अध्यक्ष पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी व्यक्तकेली.

आटपाडी येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या 29 व्या पाणी परिषदेच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, चंद्रकांत देशमुख उपस्थित होते.

वैभव नायकवडी म्हणाले, सध्या बहुतांश भागात टेंभूचे पाणी पोहोचले आहे. पाणी आलेल्या भागात वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये वीजप्रश्न, पाणीपट्टीचा प्रश्न, पाण्याच्या आवर्तनाचा प्रश्न असे प्रमुख प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चळवळ उभारली जाईल.

राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, आटपाडी तालुका नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पाठीमागे राहिला आहे. त्यांनी सुरू केलेले काम यापुढेही चालूच राहील. त्याच ताकतीने आटपाडी तालुका दि. 26 जूनच्या पाणी परिषदेमध्ये सहभागी होईल. पाणी परिषदेसाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून संबंधित खात्याच्या मंत्र्यांना निमंत्रण देण्याची त्यांनी शेवटी सूचना केली.

माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख म्हणाले, पूर परिस्थितीत मागणी नसताना अतिरिक्तहोत असलेले पाणी दुष्काळी भागाला सोडण्यात आले. त्यावेळी कोणतीही पाणीपट्टी किंवा विजेचे बिल मागितले नाही. परंतु आता शेतकरी पाणी मागत असताना पूर्वीची थकबाकी भरल्याशिवाय पाणी देणार नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. हा दुष्काळी भागातील शेतकरीवर्गावर केलेला अन्याय आहे. टेंभू योजनेच्या वीज बिलाचा 81-19 फॉर्म्युल्याबाबत पाणी परिषदेत चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी आवाज उठवला जावा.

यावेळी बाळासाहेब नायकवडी, शिवाजीराव कालुंगे, चंद्रकांत देशमुख, सी. पी. गायकवाड, दाजी देशमुख, हरिभाऊ माने, व्ही. एन. देशमुख, प्रा. विश्वंभर बाबर, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button