सांगली : स्वाभिमानीला दणके देण्यास सुरुवात | पुढारी

सांगली : स्वाभिमानीला दणके देण्यास सुरुवात

सांगली; पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी आघाडीला दणके देण्यास सुरुवात केली आहे. शिक्षक समितीचा मिरजेचा बालेकिल्ला संघाच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे अधिकच मजबूत झाला आहे. शिक्षक बँकेच्या निवडणुकीत पुरोगामी सेवा मंडळ उच्चांकी मतांनी निवडून येईल, असा दावा शिक्षक समितीचे राज्यनेते विश्वनाथ मिरजकर यांनी केला आहे.

प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप मजलेकर, महिला आघाडी कोषाध्यक्ष तृप्ती स्वामी, सोनाली पुजारी, ललिता वाडकर, अस्मिता भोकरे यांनी शिक्षक समितीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मिरजकर बोलतहोते.

यावेळी किरणराव गायकवाड म्हणाले, मिरजेतील शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केल्यामुळे विरोधकांना उमेदवारही मिळालेले नाहीत. केवळ अडीच उमेदवार तेही उसने आणि उधार घेऊन लढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे खूप मोठ्या फरकाने विरोधी आघाडीचा पराभव निश्चित आहे.

प्रदीप मजलेकर म्हणाले, आज अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांसोबत अण्णांचेच वारस हातमिळवणी करत असल्याचे पाहून खूप दुःख झाले. म्हणूनच मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे काम करणार आहे.

श्रेणिक चौगुले म्हणाले, गेल्या निवडणुकीवरून समितीमध्ये भांडणे लावून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍यांना या निवडणुकीत कसलाही फायदा होणार नसून त्यांचा तोटाच होणार आहे.

यावेळी राज्य संघटक सयाजीराव पाटील, पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष किसन पाटील, सचिव शशिकांत भागवत, जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, तुकाराम गायकवाड, सुनील गुरव, सतीश पाटील, अण्णासाहेब जाधव, श्रीकांत मांजरे, विजय पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button