कर्नाळ रस्त्यावर अनैतिक संबंधातून तरुणास भोसकले | पुढारी

कर्नाळ रस्त्यावर अनैतिक संबंधातून तरुणास भोसकले

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधातून चंद्रकांत उत्तम हेगडे (वय 29, रा. नवीन वसाहत, टिंबर एरिया, सांगली) या तरुणास चाकूने भोसकण्यात आले. सांगली-कर्नाळ रस्त्यावर म्हसोबा मंदिरजवळ रविवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.

हेगडे याला भोसकताच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अंधार असल्याने तो मृत होऊन पडला आहे, असा समज करून हल्लेखोर पसार झाले. ते जाताच हेगडेने रक्तबंबाळ अवस्थेत भीतीने स्वत: दुचाकीवरून एकटाच नांंद्रेपर्यंत प्रवास केला. तेथील दर्ग्याजवळ तो पडला. हा प्रकार पाहून काही ग्रामस्थ त्याच्या मदतीसाठी धावले. त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तो बचावला.

याप्रकरणी समीर नदाफ, अमित भिसे व अल्ताफ नदाफ (सर्व रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) या तीन हल्लेखोरांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी चंद्रकांत हेगडे हा सोमवारी दुपारी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला.

संशयितांच्या शोधासाठी नांद्रे, मौजे डिग्रज, कर्नाळ, पद्माळे व वसडगे परिसरात छापे टाकण्यात आले. पण कोणाचा सुगावा लागला नाही. हेगडे हा गवंडी काम करतो. त्याच्या हाताखाली एक महिला कामाला होती. तिच्याशी त्याचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा होती. त्यातून हेगडे व संशयितांचा वाद झाला होता. रविवारी रात्री संशयित समीर नदाफ व हेगडे हे दोघे मार्केट यार्डातील एका दुकानात दारु पिण्यासाठी बसले होते. तेथून त्यांनी कर्नाळ रस्त्यावर ढाब्यावर जेवायला जाण्याचे नियोजन केले.

दोघांकडेही दुचाकी होती. दोघे जेवायला गेले. कर्नाळ रस्त्यावर म्हसोबा मंदिरजवळ गेल्यानंतर नदाफने लघुशंकेचा बहाणा केला. तत्पूर्वी त्याचे दोन साथीदार अमित भिसे व अल्ताफ नदाफ हे अंधारात दबा धरुन बसले होते. या सर्वांनी हेगडेला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. नदाफने खिशातील चाकू काढून हेगडेच्या पोटात दोन वेळा भोसकले. काही क्षणातच हेगडे रस्त्यावर कोसळताच संशयितांनी पलायन केले. ग्रामीण पोलिसांनी पहाटेच्यावेळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Back to top button