‘पुढारी’ एज्यु दिशा प्रदर्शनाची उत्कंठा शिगेला | पुढारी

‘पुढारी’ एज्यु दिशा प्रदर्शनाची उत्कंठा शिगेला

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे सुमारे अडीच वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीची परवड झाली. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसानही झाले. आता या परिस्थितीतून बाहेर पडत असताना पुन्हा एकदा तमाम विद्यार्थी व पालकांसाठी ‘पुढारी’ एज्यु दिशा सोबतीला आला आहे. सुमारे अडीच वर्षांच्या कोरोना ब्रेकनंतर भविष्याचा अचूक वेध घेणारं ‘पुढारी’चं ‘पुढारी एज्यु. दिशा 2022’ हे भव्य शैक्षणिक प्रदर्शन शुक्रवार दि. 10 जूनपासून सुरू होत आहे. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. शैक्षणिक वर्तुळात या प्रदर्शनाची प्रचंड उत्कंठा लागून राहिली आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वपूर्ण टप्पा असलेल्या 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना आता वेध लागलेत ते निकाल व पुढील अ‍ॅडमिशनचे. जीवनाची दिशा ठरवणारा प्रवेशाचा निर्णय घेताना सारेच विद्यार्थी अन पालकही गोंधळून जातात. गेली सुमारे अडीच वर्षे तर कोरोनामुळे विद्यार्थी व पालक हतबल झाले होते. शिक्षणाची एवढी आबाळ झाली की भविष्यच अंधकारमय बनले होते.

मात्र, आता चिंता सोडा. ‘पुढारी’ पुन्हा एकदा विद्यार्थी, पालकांसाठी वाटाड्या बनून आला आहे. ‘पुढारी एज्यु. दिशा 2022’ हे शैक्षणिक प्रदर्शन शुक्रवार दि. 10, 11 व 12 जून रोजी होत आहे. राम मंदिर कॉर्नर येथील कच्छी जैन भवनमध्ये तीन दिवस विद्यार्थी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी उपलब्ध होत आहे.

सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत होणारे हे प्रदर्शन उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा दाखवण्यास उपयुक्त ठरणार आहे. तज्ज्ञांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही त्याची ओढ लागून राहिली आहे.

नामांकित संस्थांबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र, व्याख्याने प्रदर्शन काळात आयोजन केली आहेत. प्रदर्शनामध्ये एमपीएससी, युपीएससी तयारी, आयटी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा व संधी, इंजिनिअरिंगमधील नव्या संधी, फिशरीज, नॅनोटेक्नॉलॉजी तसेच उज्ज्वल करिअरसाठी कोरोनानंतरच्या विविध नव्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती मिळणार आहे. या व्याख्यानामधून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन होणार आहे.

‘पुढारी’च्या या प्रदर्शनाची शैक्षणिक वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. 10 वी व 12वीचा निकाल लवकरच लागणार आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी ‘पुढारी’ एज्यु दिशा’ प्रदर्शनाला नक्कीच भेट द्यावी लागणार आहे.

‘पुढारी’ एज्यु दिशा…उज्ज्वल भविष्याची आशा

* कोरोनामुळे बिघडलेली मुलांच्या शैक्षणिक करिअरची गाडी ‘पुढारी’च्या एज्यु. दिशा प्रदर्शनामुळे रुळावर येणार.
* प्रदर्शनाच्या माध्यमातून नामांकित शैक्षणिक संस्थांसोबत त्यांच्या दर्जेदार शिक्षणाची माहिती एकाच छताखाली मिळणार.
* विज्ञान, कला, वाणिज्य, संरक्षण, कायदा, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, संगणक, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट आदी क्षेत्रातील शिक्षणाची कवाडे खुली होणार.
* विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार असून ज्ञानपर्वाचा खजिनाच उपलब्ध होणार आहे.

Back to top button