सांगलीत प्रज्वलित झाली अखंड शिवज्योत | पुढारी

सांगलीत प्रज्वलित झाली अखंड शिवज्योत

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : ‘जय भवानी… जय शिवाजी..’ हर…हर…महादेव…, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशा घोषणा, लेझर शोचा झगमगाट, झांज-पथक, ढोल-ताशे आणि डिजेच्या निनादात भव्य-दिव्य मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सोमवारी देशातील पहिली अखंड शिवज्योज प्रज्वलित झाली. हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमींच्या गर्दीचा अलोट जनसागर मारूती चौकात उसळला होता.

सांगली शहरातील तरुणांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम व ध्येयवाद कायम तेवत राहावा यासाठी पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन, गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व शिवप्रेमी यांच्यामार्फत या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांच्याहस्ते पवित्र शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवप्रेमींनी मोटारीतून मिरवणुकीने ही शिवज्योत सांगलीत आणली. मार्गात अनेक ठिकाणी ज्योतीचे फुलांची उधळण, ओवाळून स्वागत करण्यात आले.

टिळक चौकात आल्यानंतर शिवज्योतीचे फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीने स्वागत करण्यात आले. पूजन केल्यानंतर शिवज्योतीच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. ढोल-ताशे, झांज पथकाच्या निनादात ज्योतीची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी शिवज्योतीवर फुलांची उधळण केली. मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी भगवे ध्वज लावले होते. टिळक चौक, दत्त-मारूती रस्त्यावर लावलेल्या भव्य-दिव्य भगव्या ध्वजांनी वातावरण आणखीनच भारावून सोडले.

शिवरायांच्या जयघोषात सायंकाळी मारूती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवज्योत आणण्यात आली. डीजे अन् फटाक्यांची आतषबाजीने अवघे वातावरण शिवमय झाले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणेने सारा आसमंत निनादला. लेझर शोमुळे सारा परिसर उजळून निघाला. उपस्थित सर्वांचे मन, तन शिवरायांच्या आठवणीने रोमांचित झाले.

यानंतर शिवज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिजाऊ वंदना देण्यात आली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील, या उपक्रमाची संकल्पना मांडणारे वीरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, माजी महापौर सुरेश पाटील, संजय बजाज, राहुल पवार, दीपक शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली.
यावेळी ए. डी. पाटील, डॉ. संजय पाटील, बिपीन पाटील, रवी खराडे, आयुब निशानदार, नितीन चव्हाण, अजय देशमुख उपस्थित होते.

Back to top button