चांदोली – कारवार ‘टायगर कॉरिडॉर’ रखडला! | पुढारी

चांदोली - कारवार ‘टायगर कॉरिडॉर’ रखडला!

सांगली; विवेक दाभोळे : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोलीपासून खाली कारवारच्या जंगलापर्यंत प्रस्तावित असलेला ‘टायगर कॉरिडॉर’ चा प्रस्ताव रखडला आहेे. पश्‍चिम घाटीतील वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरणारा संरक्षक पट्टा अर्थात ‘कॉरिडॉर’चे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी वन्यजीव प्रेमींमधून होऊ लागली आहे.

पश्‍चिम घाट प्रदेशात कोयना, चांदोली, दाजीपूर अभयारण्याचा सलग पट्टा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. यासाठीचे काम सुरू असतानाच उच्च पातळीवरून कोयना, चांदोली, राधानगरी ते खाली कारवारपर्यंतचा डोंगरी टापू ‘टायगर कॉरिडॉर’ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. राज्य शासनाने तो मान्य देखील केला होता. मात्र यासाठीच्या कामाला फारशी गती नसल्याचे चित्र आहे. अजून देखील हा प्रस्ताव बासनातच गुंडाळला असल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने चांदोलीसह कोयना अभयारण्याचा समावेश करत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढली. त्यानंतर हा व्याघ्र प्रकल्प पूर्णत्वास आला. याला आता तीन चार वर्षे झाली.

‘कॉरिडॉर’साठी निधीची गरज

‘कॉरिडॉर’ उभारणीच्या कामासाठी टायगर प्रोजेक्टसाठीच्या मूलभूत कामांना गती देण्याचे शासनाने जाहीर केले होते. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील पश्‍चिम घाट प्रदेशाच्या विकासासाठी या प्रकल्पाला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र गेल्या बारा-तेरा वर्षांपासून हा महत्वाकांक्षी प्रकल्प रखडलेला आहे. तत्कालीन वनमंत्री ना. डॉ. पतंगराव कदम यांच्याबरोबरच लोकप्रतिनिधींनी यासाठी ताकद पणाला लावली होती, मात्र त्याला फारशी गती आली नाही.

टायगर कॉरिडॉर राहिलाच

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्तीनंतर राज्यातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या चार, तर देशातील व्याघ्र प्रकल्प 39 झाली आहे. चांदोलीसह कोयना, राधानगरी या टापूतील वाघ, बिबट्यांची संख्या वाढत आहे. मात्र ‘कॉरिडॉर’चा प्रस्ताव रेंगाळला आहे. याचे काम तातडीने करण्याची गरज आहे.

वन विभागाच्या प्रस्तावानुसार कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्यात मिळून 714.22 चौरस किलोमीटर क्षेत्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. यात ‘चांदोली’ च्या 317.67 चौरस किलोमीटर, तर ‘कोयना’ च्या 423.55 चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. नंतर यात कोयना, चांदोली, राधानगरी या संरक्षक टापूचा समावेश करण्यात आला. किमान आता टायगर कॉरिडॉर विकसित करण्याच्या कामाला गती देण्याची गरज व्यक्‍त होत आहे.

टायगर कॉरिडॉरची संकल्पना

सुरुवातीच्या काळात जंगलात वाघ मुक्तपणे फिरत होते, त्याच मार्गाने त्याचा प्रवास व्हावा ही खरे तर टायगर कॉरिडॉरची संकल्पना! चांदोली, दाजीपूर, राधानगरीपासून खाली कारवारपर्यंत आता विविध कारणांनी एकेकाळी घनदाट असलेले जंगल विरळ होत आहे. मात्र वाघांना नैसर्गिक वातावरणात आणि संरक्षक टापूत फिरता यावे यासाठी हा कॉरिडॉर ज्या मार्गांनी जाईल त्याचा नकाशा तातडीने तयार करण्याची गरज आहे. सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर ‘टायगर कॉरिडॉर’ साकारू शकतो. तसेच यातून वाघांना ‘वाघा’सारखे निर्भयपणे फिरता येऊ शकते.

Back to top button