सांगलीसह जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपीट | पुढारी

सांगलीसह जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपीट

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली शहरासह कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, वाळवा तालुक्यासह ठिकठिकाणी गुरुवारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. काही भागात गारपीट झाली. रस्त्यावर गारांचा खच पडला होता. गारपिटीमुळे द्राक्ष पिकांसह इतर पिकांना फटका बसल्याने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत.

सांगलीत सकाळपासून उकाडा जाणवत होता. दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. दुपारी चारच्या सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने वाहनचालक आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातही वादळी वार्‍यासह गारपीट झाली. जोरदार वार्‍याने काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या.

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरासह पश्चिम विभागातील खरशिंग परिसरातही जोरदार वार्‍यासह पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात गारांचा पाऊस पडला. या भागात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. कुची येथे नारळाच्या झाडावर वीज पडली. शहरात गारांच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

सोनी : मिरज तालुक्यातील सोनीसह भोसे, पाटगाव येथे वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. या परिसरात काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता.

आष्टा : आष्टा शहर व परिसराला सायंकाळी वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह गारांचा जोरदार पाऊस झाला. या पावसाने भाजीपाला व फळबागासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, फाळकेवाडी, नागाव, पोखर्णी, बावची, गोटखिंडी या भागातही जोरदार पाऊस पडला.

पलूस : तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाने झोडपून काढले. कुंडल, दुधोंडी रामानंदनगर, भिलवडी, आमणापूरसह परिसरात जोरदार सरी बरसल्या. बुर्ली, नागठाणे, संतगाव, अंकलखोप परिसरात गारपीट झाली. परिणामी द्राक्ष शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तसेच येथील धोंडीराज यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या जंगी कुस्त्याचे मैदान रद्द करण्यात आले आहे.

लिंगनूर : सांगलीचाबुकस्वारवाडी येथे गारपीट झाली. यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. सलगरे येथे हलका पाऊस पडला.

Back to top button