सांगली : नियोजनातून आले, हळदीचे उत्पादन | पुढारी

सांगली : नियोजनातून आले, हळदीचे उत्पादन

सांगली; पुढारी वृत्तसेवा : हळद आणि आल्याची लागवड करताना बियाणाची योग्य निवड महत्त्वाची आहे. लागवड करताना माती परीक्षण करा, सेंद्रिय खत, पाण्याचा योग्य वापर करून कीड आणि रोगावर नियंत्रण केल्यास यातून भरघोस उत्पन्न मिळू शकते. जमिनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या पिकांची लागवड करा, असा सल्ला अभ्यासक डॉ. जितेंद्र कदम यांनी दिला.

दैनिक पुढारी माध्यम समूह आणि जिल्हा कृषी विभागातर्फे आयोजित ‘अ‍ॅग्री पंढरी’ या कृषी प्रदर्शनाचे ‘हळद व आले : उत्पादनात वाढ व भविष्यातील संधी’ या विषयावर ते बोलत होते.

डॉ. कदम म्हणाले, अक्षय्य तृतीयेला हळदीची लागवड केली जाते. जगातील 80 टक्के हळदीचे उत्पन्न भारतामध्ये घेतले जाते. हळद निर्यात करून उत्पादकांनी जास्तीत जास्त नफा घ्यावा.

ते म्हणाले, पूर्वी सुपीक जमीन होत्या. मात्र रासायनिक खत आणि पाण्याचा अतिरिक्त वापर यामुळे जमीन क्षारपड झाल्या आहेत. यासाठी तीन वर्षातून एकदा हळद आणि आल्याचे पीक घेतले पाहिजे.

डॉ. कदम म्हणाले, हळदीची लागवड करताना नोंदणीकृत बियाणाची निवड करा. हळद दर कुरकुमीनच्या प्रमाणावर दिला जातो. त्यामुळे कुरकुमीनचे प्रमाण जास्त असणार्‍या वाणाची निवड करा. रोपाची लागवड शक्यतो नका. हळद, आल्याची लागवड करताना किमान अर्धा तास बियाणे भिजवत ठेवा. जमिनीत जास्त खोलवर बियाणे घालू नका. फुटवे मर्यादित ठेवा.

ते म्हणाले, गरजेनुसार खतांचे व्यवस्थापन करा. मुदतीपयर्ंत हळद जमिनीत ठेवा. यामुळे वजन वाढेल आणि चकाकी येईल. आठ महिने झाल्यानंतर पाणी देणे थांबवा. हळद साठवणूक करण्यासाठी क्षमता वाढवा. चांगला भाव आल्यानंतर त्याची विक्री करा, असा सल्ला त्यांनी दिला.

Back to top button