वादळी पावसाने खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील ऊरूस उधळला | पुढारी

वादळी पावसाने खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील ऊरूस उधळला

विटा : पुढारी वृत्तसेवा : अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या मोठ्या पावसाने खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील ऊरूस उधळला. यात उरूसासाठी लावलेल्या स्टॉल्सचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. तर स्टॉल वाचवण्याच्या धडपडीत काही जणांना दुखापतही झाली.

तालुक्यातील प्रमुख यात्रांपैकी एक असलेल्या लेंगरे येथील पीर कलंदर बाबांचा उरूस आज (शुक्रवार)पासून  सुरू झाला आहे. आज संदलची रात्र आहे. दोन वर्षाच्या खंडित कालावधीनंतर यात्रा होणार असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यात उत्साहाचे वातावरण होते. ऊरूसासाठी गावात मोठ्या प्रमाणावर खेळणे, पाळणे आणि मिठाई, विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते. मात्र, उरुसाची यात्रा सुरू होण्यापूर्वीच पावसाला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

ऐन यात्रेच्या तोंडावर लेंगरे येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस पडला. यामुळे यात्रेसाठी आलेल्या पालातील छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन-चार दिवसांपासून मेहनतीने उभारलेली पाले अवघ्या काही मिनिटांत जमीनदोस्त झाली असून मोठे नुकसान झाले आहे. गावात पाणी शिरल्याने यात्रेसाठी उत्साहात असलेल्या ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.

यामध्ये विविध स्टॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्टॉलमधील काही लोक वाऱ्याने पाल पडल्याने किरकोळ जखमी झाले. गावातील रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहत होते. बाजारपेठेसह यात्रेसाठी पाले लावलेल्या मैदानावरही पाण्याचा खच साचल्याने छोट्या व्यापाऱ्यांचे, हातावर पोट असणाऱ्या स्टॉल धारकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. भिजत्या पावसात डोळयातील अश्रू लपवित पुन्हा नव्याने पाले उभारणे देखील त्यांच्यासाठी मुश्किलीचे झाले आहे. ऐन यात्रेत आलेल्या गारांच्या पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने दोन वर्षांच्या खंडित कालावधीनंतर उत्साही असणाऱ्या लेंगरेकरांच्या उत्साहावर पावसाने पाणी फेरले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button