सांगली : चौतीस हजार शेतकर्‍यांची वीजबिले कोरी

सांगली पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील 1 लाख 20 हजार 458 शेतकर्‍यांनी वीजबिल सवलत योजनेत सहभाग घेतला आहे. यात 34 हजार 132 शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल कोरे केले आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये थकबाकीमुळे कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही, अशी माहिती अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर व शहर कार्यकारी अभियंता खांडेकर यांनी दिली.

ते म्हणाले, जिल्ह्यातील 2 लाख 40 हजार 623 शेतकर्‍यांकडे एकूण 1286 कोटी 42 लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील महावितरणकडून निर्लेखन तसेच व्याज व दंड माफी आणि वीजबिल दुरुस्तीनंतर समायोजनेतून या शेतकर्‍यांकडे आता 1025 कोटी 43 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील 50 टक्के रक्कम येत्या दि. 31 मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित 50 टक्के थकबाकी म्हणजे 512 कोटी 71 लाख रुपये माफ होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांचे वीजबिल देखील पूर्ण कोरे होणार आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंत 1 लाख 20 हजार 458 शेतकर्‍यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलापोटी 176 कोटी 32 लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे या शेतकर्‍यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण 180 कोटी 94 लाख रुपये माफ झाले आहेत.

यामध्ये 34 हजार 132 शेतकरी वीजबिलांमधून पूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीची 50 टक्के रक्कम असा एकूण 106 कोटी 20 लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी 66 कोटी 58 लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

कृषिपंपाच्या थकीत व चालू वीजबिलांच्या भरण्यामधून सांगली जिल्ह्याच्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी 93 कोटी 93 लाख असे एकूण 187 कोटी 86 लाख रुपये कृषी अकस्मिक निधीमध्ये जमा झाले आहेत. या निधीमधून वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाचे कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 5 नवीन उपकेंद्र व 1 उपकेंद्राची क्षमतावाढ या निधीमधून प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यातील 3 नवीन उपकेंद्रांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

461 कामे प्रगतीपथावर

जिल्ह्यात 48 कोटी 92 लाख रुपये खर्चाच्या 649 विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. कृषी अकस्मिक निधीमधून आतापर्यंत 15 कोटी 25 लाख रुपये खर्चाचे 508 कामे सुरू करण्यासाठी कामाचा आदेश देण्यात आला आहे. त्यातील 461 कामे प्रगतीपथावर आहे. 47 विविध कामे पूर्ण झाली आहेत.

हेही वाचा

Exit mobile version