सांगली: जिल्ह्यात 123 शिक्षक बोगस? | पुढारी

सांगली: जिल्ह्यात 123 शिक्षक बोगस?

सांगली पुढारी वृत्तसेवा : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सांगली जिल्ह्यात 123 शिक्षक बोगस असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आली. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिला आहे.

याबाबत त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक पात्रतेसाठी लागणार्‍या टीईटी परीक्षेत राज्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप काहीजणांनी केला होता. त्यानंतर राज्यसरकारने या भरतीच्या चौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये राज्यस्तरावरील काही बडे अधिकारी सापडले आहेत.

या अधिकार्‍यांच्या घरात धाडी टाकल्यानंतर मोठे घबाड सापडल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. जिल्हानिहाय चौकशीचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातून याबाबतची संशयित नावे शिक्षण खात्याला कळविली होती.

आज यातील बोगस शिक्षकांची यादी समोर आली. यातून सांगली जिल्ह्यात 123 शिक्षक बोगस असल्याची माहिती संघटनांच्या हाताशी आली आहे. याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Back to top button