सांगलीत पूर्ववैमनस्यातून गुन्हेगाराचा निर्घृण खून | पुढारी

सांगलीत पूर्ववैमनस्यातून गुन्हेगाराचा निर्घृण खून

सांगली; पुढारी वृत्तसेवा : शहरातील उत्तर शिवाजीनगरमधील एका कॅफेबाहेर पूर्ववैमनस्यातून नवनाथ दिलीप लवटे (वय २६, रा. शिवशंभो चौक, सांगली) या गुन्हेगाराचा कोयत्याने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी संशयित सराईत गुन्हेगार योगेश दिलीप शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवनाथ लवटे आणि योगेश शिंदे हे दोघे मित्र होते. परंतु दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. यातून वादावादीचे प्रकार देखील घडले होते. त्यातून दोघांत धुसपूस सुरू होती.

दोघे शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास उत्तर शिवाजीनगरमधील कॉलेज कॉर्नर जवळ असलेल्या एका कॅफेमध्ये गेले होते. दोघे समोरासमोर आल्याने त्यांच्यात पूर्ववैमनस्यातून पुन्हा वादावादी झाली. जोरदार वादावादीनंतर नवनाथ हा कॅफेच्या बाहेर गेला.

परंतु वादावादी आणि पूर्ववैमनस्याच्या रागातून योगेश हा नवनाथ याच्या पाठीमागे धावत जावून त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. नवनाथ याला काही कळण्याच्या आतच योगेश याने त्याच्या पोटात, पाठीत कोयत्याने भोकसले. तर त्याच्या कपाळावर आणि हातावर असे ८ वार करण्यात आले आहेत. कोयत्याचे वर्मी घाव बसल्याने नवनाथ हा रक्ताच्या थारोळ्यात कॅफेबाहेर पडला. ही घटना कळताच कॅफेमध्ये बसलेल्या काही तरुणांनी नवनाथ याला उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर सिव्हील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले.

मयत नवनाथ आणि संशयित हल्लेखोर योगेश हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. योगेश याला विविध गुन्ह्यात तडीपार करण्यात आले होते. खूनाची माहिती मिळताच नवनाथ याचे नातेवाईक आणि मित्रांनी सांगली सिव्हील हॉस्पिटल आवारात मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मयत खंडणीतील संशयित

काही महिन्यापूर्वी सांगली बाजार समितीच्या एका संचालकाला काही जणांनी दहा लाखाची खंडणी मागितली होती. त्यामध्ये नवनाथ लवटे याचा देखील समावेश होता. त्याच्यावर खंडणीसह चोरीचा देखील गुन्हा दाखल होता.

मोक्का तर मोक्का लवकरच ३०२

मयत नवनाथ लवटे याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडवली होती. दररोज वेगवेगळे स्टेटस ठेवून तो गुन्हेगारी क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने शनिवारी सकाळी व्हॉट्सअ‍ॅप वर मोक्का तर मोक्का लवकरच ३०२ असा स्टेटस ठेवला असल्याची चर्चा सुरू होती. त्यातूनच हा त्याचा खून झाला असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत होती.

Back to top button