आटपाडी : समन्यायी पाणी प्रकल्प अंतिम टप्प्यात ; डॉ. भारत पाटणकर यांची माहि | पुढारी

आटपाडी : समन्यायी पाणी प्रकल्प अंतिम टप्प्यात ; डॉ. भारत पाटणकर यांची माहि

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा

टेंभू योजनेतून बंदिस्त पाईपने शेतीला पाणी देणारा समन्यायी पाणीवाटपाचा देशातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचे काम आटपाडी तालुक्यातील जनतेच्या दीर्घकाळच्या लढ्याने आता अंतिम टप्प्यात आले आहे. अंतिम वितरिकेच्या आराखड्याचे (आटपाडी) काम चालू आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते भारत पाटणकर यांनी दिली.

भिंगेवाडी येथील कृषि तंत्र निकेतन विद्यालयात पथदर्शी प्रकल्पाच्या कामाची वाटचाल (आटपाडी)  आणि सद्यस्थितीचा आढावा डॉ. पाटणकर यांनी पत्रकार बैठकीत मांडला. आनंदराव पाटील, भारत पाटील,अशोक लवटे, चंद्रकांत दौंडे, सादिक खाटीक,मनोज पाटील उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, पाणी वाटप आराखड्यात कोणत्याही चुका होऊ नयेत आणि पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी तयार केलेल्या याद्या आणि आराखडा घेऊन प्रत्येक गावात घेऊन आम्ही जात आहोत. अनेक कुटुंबे आणि शेतीचे क्षेत्र वंचित राहिल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे. प्रत्येक गावच्या शेतकर्‍यांनी याआराखड्याची (आटपाडी) तपासणी करावी.

ते म्हणाले 1993 मध्ये क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली पाणी परिषद झाली. दि.20 ऑगस्ट 1996 ला 16 हजार हेक्टरला पाणी देण्यास मंजुरी दिल्याचे पत्र शासनाने दिले. फेब्रुवारी 2005 ला मुंबईच्या आझाद मैदानावर धरणग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांचे मोठे आंदोलन झाले. फेरआखणी पथदर्शक प्रकल्पाला मंजुरी मिळाली. आटपाडी, तासगाव आणि सांगोला तालुक्यात हा प्रकल्प राबविण्याचे निश्चित झाले.
ते म्हणाले, समान पाणी वाटप करणे शक्य असल्याचे चळवळीने सिद्ध करून दाखविले. निधीसाठी दहा वर्षे अभ्यास आणि चळवळ सुरू राहिली.2016 मध्ये मंत्रालयात दोन बैठका झाल्या आणि बंद पाईपलाईनला निधी मंजूर झाला. समान पाणी पट्टी चळवळीने रेटा लावत वीज बिलासाठी 81/19 चे धोरण मान्य करून घेतले. योजनेतून वगळलेल्या गावांचा नव्याने योजनेत समावेश करून घेतला.

डॉ. पाटणकर म्हणाले, बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला कायद्यानुसार समान पाणी वाटप करण्याचा देशातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे. राज्यभर हा प्रकल्प राबविल्यास महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. या कामासाठी तयार केलेले आराखडे, लाभार्थी शेतकर्‍यांच्या याद्या घेऊन प्रत्येक गावागावांत वाडी-वस्तींवर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

मुख्य वितरिकेचे काम पूर्ण

या महत्त्वाकांक्षी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पाच्या मुख्य वितरिकेचे काम पूर्ण झाले आहे. तालुक्यातील प्रत्येक शेतकरी आणि त्याचे क्षेत्र, बंधारे, तलाव, पाझर तलाव, नालाबांध, शेततळी, विहिरी या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी देण्यासाठी अंतिम वितरिकेच्या आराखड्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे.

Back to top button