बामणी मध्ये गव्याचे दर्शन | पुढारी

बामणी मध्ये गव्याचे दर्शन

मिरज ; पुढारी वृत्तसेवा : निलजी-बामणी (ता. मिरज) येथे मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गवा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मिरजेकडून तो बामणीकडे आला असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत वन विभागाकडून गव्याचा शोध सुरू होता.

सांगलीसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्याचा वावर वाढला आहे. दि. 28 डिसेंबर रोजी सांगली शहरात गवा आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तब्बल 72 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला पकडून नैसर्गीक अधिवासात सोडण्यात आले होते.

निलजी-बामणी परिसरात मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पूर्णवाढ झालेला एक गवा काही ग्रामस्थांना आढळून आला. तो गवा मिरजेकडून बामणीकडे आला असल्याचे सांगण्यात आले.

परंतु ज्या ठिकाणी त्याच्या पायाचे ठसे आढळून आले तेथे तो तीन ते चार वेळा एकाच ठिकाणी वारंवार फिरला असल्याचे दिसून येते. त्यामुळे मिरजेकडून येवून तो नेमका कोणत्या दिशेला गेला हे मात्र समजू शकले नाही.

बामणीत गवा आल्याची बातमी वार्‍यासारखी परिसरात पसरली. याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अधिकार, मानद संस्थेचे पदाधिकारी इत्यादींनी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा पर्यंत गव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तो मिळून आला नाही. वन विभागाचे एक पथक गवा आढळून आलेल्या ठिकाणी तळ ठोकून आले, गव्याचा शोध सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

Back to top button