Corona : खारघर वसाहतीमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण: प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन | पुढारी

Corona : खारघर वसाहतीमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण: प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर वसाहतीमध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळला. महापालिकेच्या नागरी आरोग्य वर्धिनीतून संबंधित बाधिताने बाह्य रुग्णसेवेतून उपचार घेतल्यानंतर त्यास संसर्ग झाल्याचे उजेडात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर हा बाधित त्याच्या घरात गृहविलगीकरणात राहिला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. Corona

खारघर वसाहतीमधील सेक्टर १६ येथील वास्तुविहार या इमारतीमध्ये राहणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. तसेच कळंबोली वसाहतीमध्ये शुक्रवारी स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण पालिकेच्या आरोग्य विभागाला आढळला आहे. साथीचे आजार वाढल्याने रहिवाशांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. महापालिका आयुक्तांनी पालिका प्रशासनाला सज्ज राहण्याची सूचना केली आहे. Corona

महापालिकेकडे असणाऱ्या प्राणवायूच्या क्षमतेसह पुरेसा औषधसाठा तसेच सरकारी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णखाटा आणि पनवेल पालिका परिसरातील खासगी रुग्णालयामध्ये रुग्णखाटांचा आढावा घेतला आहे.

पनवेल महापालिकेचे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्याबरोबर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या झालेल्या बैठकीमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात १२९१ रुग्णखाटा कोरोनासाठी उपलब्ध आहेत. प्राणवायू असलेल्या ७८९ रुग्णखाटा, अतिदक्षता विभागात २५८ रुग्णखाटा, व्हेंटीलेटर रुग्णखाटा ९४ आणि प्राणवायू नसलेल्या २४४ खाटा उपलब्ध आहेत.

कोणालाही अद्याप मुखपट्टी सक्ती करण्यात आली नसली तरी सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी मुखपट्टी घालावी, हात स्वच्छ धुवावे, ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांनी महापालिकेने सुरू केलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रातून उपचार घ्यावेत.

– गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

हेही वाचा 

Back to top button