पॅरिस : कोरोनाने शारीरिक व मानसिक आजारांबरोबरच शालेय शिक्षणाच्या दर्जावरदेखील विपरीत परिणाम केला आहे. अगदी प्रत्येक चौथा विद्यार्थी वाचन, तसेच गणित-विज्ञानात कमकुवत झाला आहे, असा निष्कर्ष ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या (ओईसीडी) एका अहवालातून जाहीर करण्यात आला आहे. वाचनक्षमतेबरोबरच गणित-विज्ञान समजून घेण्याच्या क्षमतेवरही मोठा परिणाम झाल्याने शालेय मुले या सर्व आघाड्यांवर आता बरीच कमी पडत आहेत, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. (Corona)
ओईसीडी ही पॅरिसस्थित संघटना असे म्हणते की, 2018 च्या तुलनेत शालेय विद्यार्थ्यांची वाचनक्षमता 10 टक्क्यांनी तर गणितातील क्षमता 15 टक्क्यांनी घटली आहे. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, प्रत्येक चौथ्या मुलाची बौद्धिक क्षमता घटली असून, यामुळे विज्ञानातील संज्ञा समजून घेण्यात आणि गणितातील समीकरणांची उकल करण्यात ते कमी पडत चालले आहेत.
जर्मनी, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड या देशांतील मुलांमध्ये गणिताबद्दल विशेष रुची आढळून आली. मात्र, अनेक देशांमध्ये हा स्तर विशेषत: कोरोनानंतर घसरत चालला असल्याचे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. कोरोनामुळे खंड तर पडलाच. त्याही शिवाय शिक्षण प्रणालीवर विपरीत परिणाम झाल्याने त्याचेही तोटे आता जाणवत आहेत, असे संशोधकांनी यावेळी नमूद केले.
या सर्वेक्षणांतर्गत जगभरातील 7 लाख विद्यार्थ्यांवर संशोधन केल्याचा ओईसीडीने यावेळी नमूद केले आहे. सर्व्हेत एकूण 81 देशांमधील विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले. यातील बहुतांशी देश श्रीमंत देश म्हणून ओळखले जातात आणि तेथील शिक्षणाचा स्तरदेखील अन्य देशांच्या तुलनेत सरस मानला जातो.
Corona : जेथे मोबाईल क्लासेस, तेथेच अधिक नुकसान!
या संशोधनात असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे की, ज्या देशात कोरोना कालावधीत अतिरिक्त शिक्षक नेमून अभ्यास घेणे सुरू ठेवण्यात आले, तेथील विद्यार्थ्यांमध्ये फारसा विपरीत परिणाम दिसून आला नाही. ज्या देशात शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे सोपे होते, तेथेही परिणाम जाणवला नाही. मात्र, जेथे मोबाईलद्वारे क्लासेस घेण्यात आले, तेथील विद्यार्थी बरेच मागे पडले आहेत, असा ओईसीडीचा दावा आहे.
हेही वाचा