रायगड: महाडमधील कारखान्यांत सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यास वचनबद्ध : संभाजी पठारे | पुढारी

रायगड: महाडमधील कारखान्यांत सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यास वचनबद्ध : संभाजी पठारे

श्रीकृष्ण. द. बाळ

महाड: महाड औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांमध्ये मागील पाच वर्षात आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यापैकी एम्बायो कंपनीचा अपवाद वगळता कोठेही जीवितहानी झालेली नाही. ३ नोव्हेंबररोजी ब्ल्यूजेट कंपनीमध्ये झालेल्या दुर्घटनेत ११ कामगारांचा मृत्यू झाला. ही गंभीर बाब असून या संदर्भात महाउत्पादक संघटनेमार्फत सर्व कंपन्यांच्या सुरक्षा विषयक धोरणांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही महाड उत्पादक संघटनेचे अध्यक्ष संभाजी पठारे यांनी दिली. ते ‘दैनिक पुढारी’शी बोलत होते.

पठारे म्हणाले की, ब्ल्यूजेट कंपनीतील दुर्घटनेनंतर महाड उत्पादक संघटनेची टीम काही मिनिटांमध्येच घटनास्थळी दाखल झाली होती. परंतु, वारंवार होणारे स्फोट व वायू गळतीची शक्यता लक्षात घेऊन आयपीसीएलकडून आलेल्या पथकाला बचावकार्य करण्यात यश मिळाले नव्हते. झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. यामुळे महाड उत्पादक संघटनेने तातडीने या संदर्भात बैठक घेऊन भविष्यकालीन वाटचालीसाठी प्रत्यक्षात करावयाच्या कृतीसंदर्भात आराखडा करण्यास सुरुवात केली आहे. भविष्यकालीन उपाययोजना करण्यासाठी उत्पादक संघटना कटिबद्ध आहे.

महाड वसाहतीमधील छोट्या उद्योगांना स्वतंत्रपणे सुरक्षाविषयक यंत्रणा ठेवणे व अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे अशक्य आहे. त्यामुळे महाड उत्पादक संघटनेने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला आहे. संबंधित कारखान्यांना उत्पादक संघटनेने मदतीचा हात पुढे करून कंपनीमधील आवश्यक असलेल्या सुरक्षा विषयक बदलांबाबत सहकार्याची भावना ठेवली आहे. यापुढील काळात महाड उत्पादक संघटना नैतिक जबाबदारी पत्करून व सामाजिक बांधिलकी म्हणून आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यास वचनबद्ध असेल, असेही पठारे यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button