Raigad News : दुपारी दीडपर्यंत ८ मृतदेह सापडले: ब्लू जेट कंपनी दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन | पुढारी

Raigad News : दुपारी दीडपर्यंत ८ मृतदेह सापडले: ब्लू जेट कंपनी दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन

श्रीकृष्ण द. बाळ

महाड : रायगड जिल्ह्यातील महाडच्या ब्लू जेट कंपनीतील बेपत्ता ११ कामगारांपैकी आज (दि.४) दुपारी दीड वाजेपर्यंत आठ मृतदेह सापडल्याची माहिती महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली . कंपनीत झालेल्या या भीषण दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी ८ वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

संबंधित मृतदेह त्यांच्या नातेवाईकांसमविष्ठ दुपारी पनवेल येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये तपासणी करता नेण्यात येणार  आहेत. आज दुपारी रायगड जिल्हाधिकारी, रायगड पोलीस अधीक्षक व महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी संबंधित दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या नातेवाईकांची कंपनीच्या आवारातच भेट घेतली. आणि या घटनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून तसेच मुख्यमंत्री सहायता निधी मधून पीएसआय व कंपनीच्या पेन्शन योजनेमधून संबंधित दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याबाबतचा निर्णय घोषित करण्यात आला.

याबाबत शासकीय स्तरावर आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता तातडीने केली जाणार आहे. येत्या आठ दिवसांच्या आत या संदर्भातील प्राथमिक गोष्टी पूर्णत्वास जातील, असे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा एनडीआरएफ च्या विशेष पथकाने मृतदेह तपासणीचे सुरू केलेले काम सकाळी साडेसहा पर्यंत सुरू होते. त्यानंतर नऊ वाजल्यापासून पुन्हा सुरू झालेल्या कामाने आता वेग घेतला आहे.  दुपारी दीड वाजेपर्यंत आठ मृतदेह प्राप्त झाले. सर्व ११ बेपत्ता कामगारांचे मृतदेह पनवेल येथे तपासणीसाठी नेण्यात येणार आहेत. तेथे नातेवाईकांच्या रक्त तपासण्या केल्यानंतर संबंधितांकडे त्यांचे मृतदेह सुपूर्द केले जाणार आहेत.  या भीषण दुर्घटनेमुळे कामगारांची सुरक्षिततेबाबत अत्यावश्यक असलेल्या सोयी सुविधांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button