Raigad News : कोकणातील सागरी सुरक्षा यंत्रणेत त्रुटी | पुढारी

Raigad News : कोकणातील सागरी सुरक्षा यंत्रणेत त्रुटी

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा :  कोकणाला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. हा किनारा कायमच सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळखला जातो. गेल्या महिन्यात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चरस या अमली पदार्थांची २०० हून अधिक पाकिटे सापडली. या घटनांमुळे कोकण पट्टीवरील सागरी सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. पावसाळ्यामध्ये गस्तीसाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने या काळात सागरी सुरक्षा ही रामभरोसेच असल्याचे आढळून येते.

मुंबईला लागून असल्याने येथील सागरी सुरक्षा महत्त्व अधिकच वाढते. १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटांसाठी लागणारी स्फोटके ही रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील शेखाडी येथे उत्तरवली गेली होती. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी सागरी मार्गाचा अवलंब केला होता. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर एमटी पवित हे मोठे जहाज वाहत येऊन धडकले.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर किनारपट्टीवर एके ४७ रायफल्स व २५० काडतूसे भरलेली एक बोट वाहत आली होती. गेल्या महिन्यात रत्नागिरीसह रायगडच्या विविध समुद्र किनाऱ्यांवर चरस या अमली पदार्थांची पाकिटे वाहून आली होती. २०९ किलो वजनाची १७५ चरसची पाकिटे मिळून आली आहेत. ज्याची बाजारातील किंमत ८ कोटी ३६ लांखाच्या आसपास होती. श्रीवर्धन पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, ही पाकिटे कुठून आणि कशी आली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.
देशातील मोठ्या बंदरांपैकी जेएनपीटी बंदर हे रायगड जिल्ह्यात येते. येथून देश- विदेशातील मालाची वाहतूक होत असते. मात्र, या बंदरातही मागील काही वर्षांत तस्करीच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यात शेकडो कोटींचे हेरॉईन, कोकेन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. रक्तचंदन, प्राण्यांचे अवयव, परदेशी सिगारेट, चिनी बनावटीचे ड्रोन, सोने, दुर्मीळ चित्रे, सुपारी आदी किमती मौल्यवान वस्तुची तस्करी उघड झालेली आहे. या शिवाय किनारपट्टीवर डिझेल चोरी, वाळू उत्खनन, व्हेल माशांची उल्टीची तस्करी यामुळे कोकणची किनारपट्टीवर कोणत्या न कोणत्या गुन्हेगारौ घडामोडी सुरू असतात. या गुन्हेगारी घटनांची व्यापकता पाहाता यावर नियंत्रण आणण्यात यश आलेले नाही.

पावसाळ्याचा काळात किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणा अपुरी पडत आहे. पावसाळ्यात बंदरामध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते. बंदरात निवारा शेड नसल्याने ऊन-पावसातच विजेची, सुरक्षा साधनांचा अभाव असताना त्यांना गस्त घालावी लागते. पोलिस,
नौदलाची नौकांद्वारे होणारी गस्त पावसाळ्यात पूर्णपणे बंद असते. याचदरम्यान मासेमारीही बंद असते, त्यामुळे खोल समुद्रात घडणाऱ्या संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे सुरक्षा यंत्रणांना कठीण जाते. कोकण किनारपट्टीवर जवळपास १५० लहान-मोठी बंदरे आहेत. त्यातील ९० बंदरे संवेदनशील आहेत; तर सुमारे ६०० लैंडिंग पॉईंटस् आहेत. त्यातील ६० मत्स्य विभागाच्या ताब्यात आहेत. ३५ पॉईंटवर मासळी उतरली जाते.

कोकण किनारपट्टीवर सागरी पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली होती. पण, तरीही किनाऱ्यांवरील सागरी सुरक्षा कवच रक्कम झाल्याचे दिसून येत नाही. सुरक्षा यंत्रणांचे ठे चुकवत आज किनाऱ्यांवर अमली पदार्थ वाहून आलेत. उद्या स्फोटके आणि शस्त्रास्त्रही येऊ शकतात. त्यामुळे या घटनांना गांभीर्याने घ्यायला हवे. सुरक्षा यंत्रणामध्ये राहिलेल्या त्रुटींचा अभ्यास करायला हवा. त्या दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने पाऊले उचलायला हवीत. सागरी पोलिस, तटरक्षक आणि नौसेना, कस्टम्स यांच्यातील समन्वय वाढविणे आवश्यक आहे.

Back to top button