‘आयटीआय’ला जागा दीड लाख; अर्ज अडीच लाख | पुढारी

‘आयटीआय’ला जागा दीड लाख; अर्ज अडीच लाख

रायगड, पुढारी वृत्तसेवा : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 1 लाख 51 हजार 576 जागांसाठी 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम केले आहेत. त्यात इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, वेल्डर अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे. ड्रेस मेकिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर, कॉस्मेटोलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, सुईंग टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांबरोबरच इलेक्ट्रिशियन, वायरमनसारख्या अभ्यासक्रमांनाही मुलींनी पसंती दर्शवली आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेत इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे दिसून येत आहे. इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमाच्या 20 हजार जागांसाठी तब्बल 1 लाख 57 हजार 703 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला असून, त्यापाठोपाठ वायरमन अभ्यासक्रमाची 92 हजार विद्यार्थ्यांनी निवड केली आहे.

आयटीआयमध्ये दहावी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 86 प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते. गेल्या काही वर्षांत आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट डिझेल, मोटार मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट अशा अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. उद्योग क्षेत्रात नोकरीच्या संधींमुळे विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमांना पसंती मिळत आहे.

अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांची पसंती

इलेक्ट्रिशियन : 1 लाख 57 हजार 703
वायरमन : 92 हजार 507
फिटर : 92 हजार 127
मेकॅनिक मोटार वाहन : 67 हजार 734
मेकॅनिक डिझेल : 62 हजार 215
वेल्डर : 52 हजार 545
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट : 47 हजार 783
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : 44 हजार 200

Back to top button