इर्शाळवाडी दुर्घटना: आदिवासी पाड्याला पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी बचाव व मदत कार्याला वेग | पुढारी

इर्शाळवाडी दुर्घटना: आदिवासी पाड्याला पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी बचाव व मदत कार्याला वेग

रायगड वृत्तसेवा: रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इरशाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर जवळपास ४८ कुटुंबे त्यातील २८८ व्यक्तींसह राहत होती. १९ जुलै २०२३ रोजीची रात्र ही यातील अनेकांसाठी काळरात्र ठरली. जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट असल्याने मागच्या २४ तासात संततधार पाऊस झाला. या धुवाँधार पावसामध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी परस्थिती बिकट असल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणा दिवसभर महाड, पोलादपूर, खेापोली सह विविध गावात गुंतलेलीच होती. सायंकाळ नंतर पावसाचा भर ओसरेल असे वाटत असताना प्रत्यक्षात अनेक भागात मात्र जोरात वृष्टी होत होती.

डोंगर दऱ्यातील आदिवासी पाड्यातील या वस्तीवर अचानक कोसळलेल्या आपत्तीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी धाव घेत तातडीने भेट दिली. याचा सकारात्मक परीणाम बचाव व मदत कार्यावर झाला. मदत कार्यात गुंतलेल्या लोकांचे मनोबल उंचावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभावित लोकांशी थेट संवाद साधून, पीडितांशी बोलत, त्यांच्या गरजा, अडचणी जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी यानंतर बोलताना मृत व्यक्तींच्या कुटुबियांना ५ लाखंची मदत घोषित केली. मदत कार्य वेगात पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाला दिल्या. जखमी व्यक्तींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पीटल मध्ये दाखल करुन उपचार करण्यात येत आहेत, त्यापैकी किरकोळ दुखपत झालेल्यांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळगडच्या पायथ्याशी असलेल्या दुर्घटनाग्रस्त वाडीत पाहणी करत असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या केंद्रसरकारमार्फत येणाऱ्या मदतीची माहिती दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी थेट मोबाईल फोनवरुन संपर्क करत मदत कार्याला गती देण्यासाठी चर्चा केली. यामुळे सरकारच्या पातळीवरील निर्णयांचा वेग वाढला आहे. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विधानमंडळ अधिवेशनात सरकार करत असलेल्या उपायाबाबत संपूर्ण तपशिलवार माहिती दिली. केंद्रीय संस्थांनी तयार केलेल्या भूस्खलन होणाऱ्या यादीत या ठिकाणाचा उल्लेख नसल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेतील पिडीत व्यक्तींपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी पहाटे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचून परीस्थितीची गंभिरता पाहून पुढील निर्णय तात्काळ घेण्यात आले. त्यांचे पाठोपाठ उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे विकास व खणिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी देखील धाव घेत मदत कार्याच आढावा घेतला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या रात्रीपासूनच बचावकार्याला गती देण्यासाठी प्रशासनाच्या संपर्कात होत्या. त्यांनी जखमींची रुग्णालयात जावून भेट देखील घेतली.

या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या पिडीत लोकांची काळजी वाहताना, जखमींवर मोफत उपचार, त्यांना पुढील उपाययोजना होईपर्यंत धान्य, साखर, रॉकेल मोफत पुरवण्याची व्यवस्था केली जात आहे. यासाठी संबंधित अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आजपासून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे देखील घटनास्थळी पोहोचत आहेत. अशाप्रकरे हे मदत कार्य अविरत सुरु राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button