कोकणातील पर्यटनाला जलवाहतुकीचा सेतू | पुढारी

कोकणातील पर्यटनाला जलवाहतुकीचा सेतू

रायगड; सुयोग आंग्रे :  सागरमाला प्रकल्पाअंतर्गत भाऊचा धक्का आणि गेट वे ऑफ इंडिया येथून जलप्रवासी वाहतुकीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता ही सेवा नियमित होण्याच्या व ती पुढे सिंधुदुर्गपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. वैभवशाली परंपरा असलेली व सुरुवातीच्या काळातील दळणवळणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या जलवाहतुकीची उणीव कोकणवासीयांना सतत टोचत होती. आता ही उणीवही दूर होताना दिसत आहे. या जलवाहतूक सेवेमुळे वाहतुकीसाठी होणारा खर्च आणि वेळही वाचतो आहे. त्याचबरोबर निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधीही पर्यटकांना मिळते आहे. यामुळे मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत निर्माण केलेला जलवाहतुकीचा सेतू कोकणातील अर्थव्यवस्था आणि पर्यटन वाढीसाठी नवा आयाम ठरणार आहे.

कोरोनाचे निर्बंध सरकारने उठविल्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीबरोबर आता जलवाहतुकीचा पर्यायही पर्यटकांना उपलब्ध आहे. मुंबई ते मांडवा रो-रो सेवा कोरोनाकाळात सुरु होती. आता गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, भाऊचा धक्का ते रेवस धक्का, भाऊचा धक्का ते जेएनपीटी, भाऊचा धक्का ते मोरा, भाऊचा धक्का ते एलिफंटा अशी प्रवासी जलवाहतूक सेवा सुरू झाली आहे. आगरदांडा ते दिघी, बागमांडला ते वेश्वी, दाभोळ ते धोपावे, जयगड ते तवसाळ या दरम्यान रो-रो सेवा सुरू झाली आहे.

कोकण किनाऱ्यावर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर मच्छीमारांच्या मदतीने तराफ्यांमधून जलप्रवासी वाहतूक केली जात आहे. कोकणात जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग हा कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमधून जाणारा एकमेव मार्ग होता. यामुळे बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. रेवस ते रेड्डी असा जाणारा ४४७ किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग आहे. या मार्गाचे कामही त्यांच्या कारकीर्दीत सुरू झाले होते. मात्र मोठय़ा खाडय़ांवरील पुलांची कामे रखडल्याने सागरी मार्ग प्रत्यक्षात उपयोगात येऊ शकला नाही. आता रायगड जिल्ह्यातून५०० किलोमीटर लांबीचा ग्रीन फिल्ड कोकण इतगती महामार्ग शासनाने फास्टट्रॅकवर घेतला आहे. परंतु हे दोन्ही महामार्ग अद्याप पूर्णत्वास येण्यासाठी कालावधी लागणार आहे… ही बाब लक्षात घेऊन आगरदांडा ते दिघी, आणि बागमांडला ते बाणकोट, दाभोळ ते धोपावे, जयगड ते तवसाळ दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे.

ही सेवा पर्यटकांसाठी आज आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. रो-रो जलवाहतूक सेवेमुळे पर्यटकांना त्यांच्या गाडय़ांसह बोटीतून प्रवास करण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च आणि प्रवासाचा वेळ याची मोठी बचत होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मुरुड येथून दिवेआगर जाण्यासाठी अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. हेच अंतर आगरदांडा ते दिघी जलवाहतूकमाग्रे पाऊण ते एक तासात पार करता येते. श्रीवर्धन येथून रत्नागिरीतील दापोली, हर्णे येथे जाण्यासाठी रस्त्याने जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावा लागतो. मात्र हे अंतरही बागमांडला, बाणकोट जलवाहतुकीने तासाभरात पार करता येते. याशिवाय कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे.

अलिबाग ते मांडवा आणि रेवस ते भाऊचा धक्का दरम्यान सध्या जलप्रवासी वाहतूक केली जाते. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर ही जलवाहतूक नियमित सुरू असते. दरवर्षी मांडवा ते मुंबई दरम्यान जवळपास साडेबारा लाख प्रवासी प्रवास करतात. तर रेवस ते भाऊचा धक्का दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्याही काही हजारात आहे. या जलवाहतूक सेवेमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. या जलवाहतूक सेवांमुळे निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळते आहे. त्याच बरोबर त्यांच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ आणि इंधन खर्चतही बचत होते आहे. त्यामुळे जलवाहतुकीच्या सुविधा अधिक बळकट करणे गरजेचे आहे. आता अलिबाग तालुक्यातील रेवस ते उरण तालुक्यातील करंजा आणि भाऊचा धक्का ते काशीद अशी रो-रो सेवा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पर्यटकांना त्यांच्या गाडय़ांसह रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आणि अन्य तालुक्यांमधून मुंबईला जाता येईल, विशेष म्हणजे हे अंतर केवळ दीड तासात पार करता येणार आहे.

दक्षिण आशियात ‘इकॉनॉमिक इंजिन’ म्हणून सागरी किनारपट्टीचा वापर होतोय. किनारपट्टीवरील बंदरांचे आधुनिकीकरण करून तेथे ‘इंडस्ट्रियल क्लस्टर्स’ सागरमाला प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहेत. ग्लोबल शिपिंगच्या दृष्टीने बंदरांच्या विकासाद्वारे एक कोटी रोजगार उपलब्ध होणार आहेत. या कामाच्या नियोजनाचा रोडमॅपही तयार झाला असून, जलवाहतुकीद्वारे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे. जगात जलवाहतूक ही सगळ्यात स्वस्त आणि इकोफ्रेंडली मानली जाते.

         जलसेवेमुळे मालवाहतूक किफायतशीर

  •  पर्यटनाप्रमाणेच व्यापारी | वाहतुकीसाठी या जलसेवेचा विचार केला जात आहे. वाहतुकीचे सर्वात स्वस्त माध्यम असणारी जलवाहतूक कोकणी जनतेचे प्रमुख आर्थिक स्रोत मानले जाते. जलसेवेच्या माध्यमातून या उत्पादनांची जलद व सुरक्षित वाहतूक होणार असल्याने ताजेपणाच्या निकषावर अधिक दर मिळू शकतो.
  •  मुंबईतून कार घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला गोव्यात ती उतरवता येणार आहे. गोवा भ्रमंती करून पुन्हा कारसह मुंबईत येता येईल, अशी केंद्र शासनाची योजना प्रस्तावित आहे. जलपर्यटन हा नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. कोकणच्या या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी जलवाहतूक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Back to top button