रायगड : वणवे रोखण्यात वन विभागाला अपयश | पुढारी

रायगड : वणवे रोखण्यात वन विभागाला अपयश

अलिबाग; रमेश कांबळे :  रायगड जिल्ह्यातील जंगलांमध्ये वणवे लागल्याच्या घटनांत सध्या चांगलीच वाढ होताना दिसत आहे. या वणव्यांमुळे सुमारे दीड लाख हेक्टरवरील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या हानीबरोबरच जंगलातील प्राणी-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या वणव्याला रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचे वास्तव यातून पुढे आले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात वनवे लागल्याचा १७५ घटना घडल्या असून, ७९२ हेक्टर वनक्षेत्राला झळ बसली आहे.

रायगड जिल्ह्याला सुमारे दीड लाख हेक्टर जंगल क्षेत्र लाभले आहे. यामध्ये हजारो प्रकारची झाडे व शेकडो प्रकारचे प्राणी व पक्षी वास्तव्य करीत आहेत. वणव्यांमुळे वनसंपदा धोक्यात येत आहे. जंगलात गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी, रानआले, सोनजाई, गजकर्णिका, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, सर्पगंधा, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल, रॉबिन रानकोंबड्या, मोर, सापांच्या प्रजाती, गवतावरील कीटक, भेकरे यांसारख्या पशु-पक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

जिल्ह्यातील १८४ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अडचणीत सापडल्या आहेत. जंगलांचे वणव्यांपासून संरक्षण करण्यासाठी वन विभागामार्फत उपाययोजना करण्यात येतात. अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून जंगलक्षेत्रावर लक्ष ठेवण्यात येते वणवे लागल्यानंतर ते लागलीच आटोक्यात आणण्यासाठी वणवेरोधक बेल्ट तयार केले जातात. अनेक ठिकाणी स्थानिकांची मदत घेतली जाते. मात्र एवढे सर्व उपाय करूनही वणवे रोखण्यात वन विभागाला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.

जंगलातील अनियंत्रित वणवे शेजारील गावात शिरतात. डोंगरातील आदिवासी वाड्या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. गेल्या काही वर्षांत अनियंत्रित वणव्यांनी महाड, पोलादपूर, पेण, अलिबाग तालुक्यांतील काही आदिवासी वाड्यांना वणव्यांची झळ बसली
आहे. २०१५ मध्ये चिंबरान आदिवासी वाडीतील १३ घरे वणव्याच्या आगीत भस्मसात झाली. यामध्ये खूप मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तर महाडमधील वरंध घाट परिसरात लागलेल्या वणव्याच्या आगीत होरपळून एका महिलेचा मृत्यू झाल्याचीही घटना जिल्ह्यात घडली होती.

Back to top button