किल्ले रायगडसह सर्व किल्ले होणार प्लास्टिकमुक्त; केंद्रीय पुरातत्‍व विभागाचा निर्णय | पुढारी

किल्ले रायगडसह सर्व किल्ले होणार प्लास्टिकमुक्त; केंद्रीय पुरातत्‍व विभागाचा निर्णय

नाते, इलियास ढोकले : पर्यटकांकडून किल्ल्यांवर प्लास्टिक बाटल्या फेकल्या जात असल्याने या किल्ल्यांच्या प्लास्टिकमुक्तीसाठी बॉटल क्रशर मशिन्स बसविली जाणार आहेत. हा पहिला प्रयोग छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्‍या किल्ले रायगडपासून सुरू होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास प्लास्टिकमुक्ती शक्य होणार आहे.

गेल्या काही वर्षांत शिवभक्त व पर्यटकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार, किल्ल्यांना भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या 25 लाखांच्या घरात आहे. या पर्यटकांच्या माध्यमातून या प्लास्टिक बाटल्या टाकल्या जातात. त्यातून निर्माण होणार्‍या प्लास्टिक कचर्‍याचा प्रश्न गंभीर होत असल्याने प्लास्टिक क्रशरचा मुद्दा पुढे आला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने या समस्येचा गंभीरपणे विचार करून यासंदर्भात किल्ले रायगडसह परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला असून, याकरिता बॉटल क्रशर मशिन्सचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने केंद्रीय विभागाच्या संबंधित यंत्रणांशी संपर्क केल्यावर विविध सामाजिक व शिवभक्त संघटनांकडून प्रतिवर्षी होणार्‍या प्लास्टिकमुक्त अभियानाच्या संदर्भात विचारणा केली असता, गेल्या काही वर्षांत शिवभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात किल्ले रायगडवर वाढल्याची या अधिकार्‍यांनी माहिती दिली व नव्याने निर्माण होणार्‍या या समस्यांबाबत केंद्रीय पुरातत्त्व विभागाने किल्ले रायगडसह संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार बोलून दाखविला.

यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने आवश्यक असलेल्या खर्चास मंजुरी दिली आहे. किल्ले रायगडवर किमान दोन ठिकाणी बॉटल क्रशर मशिन्सचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किल्ले रायगडवर प्रतिवर्षी पर्यटक, शिवभक्तांबरोबर येणार्‍या प्लास्टिक बाटल्यांची संख्या विचारात घेता त्यांची पूर्ण व्यवस्था करण्यासाठी यासंदर्भात संबंधित विक्रेत्यांनी संबंधित डिपॉझिटची रक्कम ठेवून या बाटल्या संबंधितांना द्याव्यात, अशा सूचना करण्यात येणार असल्याचे सांगून, किल्ले रायगडवर दोन ठिकाणी बॉटल क्रशर करण्याची मशिन्स कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

पर्यटक, शिवभक्त यांनी केले स्वागत

केंद्रीय पुरातत्त्व विभागाने गेल्या अनेक वर्षांच्या शिवभक्तांच्या असलेल्या या मागणीच्या संदर्भात उशिरा का होईना घेतलेल्या गंभीर दखलीचे स्वागत पर्यटक, शिवभक्तांमधून केले जात असून, यासाठी स्थानिक नागरिकांसह सर्व शिवभक्त विभागास सहकार्य करतील, असा विश्वास व्यक्तहोत आहे.

Back to top button