रायगड : सहा मुलांना विहिरीत ढकलणाऱ्या आईला चार दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी

रायगड : सहा मुलांना विहिरीत ढकलणाऱ्या आईला चार दिवसांची पोलीस कोठडी

महाड : श्रीकृष्ण बाळ : महाड तालुक्यातील ढालकाठी जवळील खरवली बोरगाव या गावात एका आईने पाच मुली आणि एका मुलाला विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेण्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. या घटनेनंतर महिलेनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तिला वाचविण्यात यश आले. या प्रकारानंतर तालुक्यात मातेच्या निष्ठुरतेबाबत संताप व निष्पाप मुलांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी आज (मंगळवार) महाड एमआयडीसी व संबंधित ठिकाणी भेट दिल्याची माहिती  प्राप्त झाली आहे.

मुळचे उत्तर प्रदेशमधील असणारे चिखुरी सहानी हे आपल्या पत्नी व मुलांसह गेल्या ३ ते ४ वर्षापासून महाड तालुक्यातील खरवली बोरगाव या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वेठबिगारी म्हणून काम करणार्‍या चिखुरी सहानी व त्यांची पत्नी रुना सहानी यांच्या मध्ये सोमवारी जोराचे भांडण झाले.

या भांडणाच्या रागातून रुना सहानी हिने आपल्या दोन छोटया मुलांना घेऊन एका विहिरीत उडी घेतली. व आपल्या अन्य चौघा मुलींनाही विहिरीत उडी घेण्यास भाग पाडले. विहिरीतील पाण्यात बुडाल्याने रोशनी चिखुरी सहानी (वय १०), करिष्मा चिखुरी सहानी (वय ८), रेश्मा चिखुरी सहानी (वय ६) , विद्या चिखुरी सहानी (वय ५), शिवराज चिखुरी सहानी (वय ३) आणि राधा चिखुरी सहानी (वय दीड वर्ष) अशा सहाही मुलांचा मृत्यू झाला. मात्र, रुना सहानी हिला जिवंत बाहेर काढण्यात पोलीस व ग्रामस्थांना यश आले.

रात्री उशीरापर्यंत पाच मुली आणि एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलीस व स्थानिक ग्रामस्थांना यश आले. या घटनेची माहिती समजताच महाडचे आमदार भरतशेठ गोगावले हे घटनास्थळी उपस्थित झाले. पोलिसांनी रुना सहानी व चिखुरी सहानी यांना ताब्यात घेतले आहे. पतीसोबत झालेल्या भांडणातून आलेले नैराश्य आणि रागातून या मातेने हे कृत्य केले असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

महाड एमआयडीसीने संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला कोर्टात हजर केले असता कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिली आहे . दरम्यान सोमवारी सायंकाळी झालेल्या या घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यातील महिला वर्गामधून पाहावयास मिळत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button