

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातून राज्यसभेत (Rajya Sabha Election 2022) जाणाऱ्या जागेवरुन निर्माण झालेले नाट्य काही केल्या अद्याप संपायला तयार नाहीत. सहाव्या जागेसाठी सभाजीराजे की आणखी कोणी हा वाद संपल्यावर आता काँग्रेस राज्यसभेत पाठविणार असलेल्या उमेदवारावरुन पक्षांतर्गत वाद सुरु झाले आहेत. काँग्रेसने महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशच्या इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांना उमेदवारी दिल्यावर काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या कारणामुळे विदर्भातील काँग्रेसचे युवा नेत्तृत्व आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी या उमेदवारीबद्दल नाराजी दाखवत आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्येसभेच्या जागेवरुन काँग्रेसमधील नाराजीनाट्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेत पाठवल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये भाजपचे (BJP) दोन आणि शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP), काँग्रेस (Congress) यांच्यातील एक – एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाईल. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरातील शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांना महाआघाडीची उमेदवारी मिळाली आहे. तर या जागेसाठी भाजपने माजी खा. धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी दिली आहे. खरे तर सहाव्या जागेसाठीच सुरस रंगणार आहे. तर प्रत्येक पक्षाने जे आपले उमेदवार निवडून जाणार आहेत ते उमेदवार जाहीर केले आहेत. तर यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशचे इम्रान प्रदापगडी यांना उमेदवारी दिली आहे. (Ashish Deshmukh)
काँग्रेसने महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना व इतर महत्त्वाच्या व्यक्तींना टाळत उत्तर प्रदेशमधील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजी उमटू लागली आहे. या प्रक्रियेवर नाराज होत विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आपला सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी राजीनामा देताना आशिष देशमुख म्हणाले, 'अनेक कर्तृत्ववान नेते असूनही पक्षाने येथील नेत्यांचा विचार केला नाही. मला राज्यसभेचं आश्वासन देऊनही पक्षाने ते पूर्ण केलं नाही',
यावेळी आशिष देशमुख म्हणाले, ' महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशच्या इम्रान प्रतापगडी यांना लादल्यामुळे मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. बाहेरचा उमेदवार लादल्याने पक्षवाढीच्या दृष्टीने फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे.
यावेळी आशिष देशमुख यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला आहे. तसेच त्यांनी मी पदाचा राजीनामा देत आहे. पण, मी कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत राहणार असल्याचे सांगितले आहे.
आशिष देशमुख यांच्या पुर्वी सोमवारी काँग्रेसच्या नेत्या तथा अभिनेत्री नगमा (Nagma) यांनी देखिल अशी खंत व्यक्त केली होती. २००४ साली त्या जेव्हा काँग्रेसमध्ये दाखल झाल्या तेव्हा सोनिया गांधी यांनी (Sonia Gandhi) त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दरवेळी पक्षाकडून नगमा यांची निराशाच करण्यात आली. नगमा यांनी गेली अठरा वर्षे पक्षासाठी करीत असेलेले काम व्यर्थच ठरल्याची खंत व्यक्त केली होती.
देशभरातच काँग्रेस पक्षाची घरघर सुरु असताना पक्षनेतृत्त्वाकडून देखिल निष्ठावान नेतृत्त्व व कार्यकर्त्यांची उपेक्षाच करण्यात येत असल्याचेच वातावरण आहे. अभिनेत्री नगमा यांच्या नाराजीनंतर महाराष्ट्रातील आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर गुजरामध्ये काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून हार्दीक पटेल यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. आता ते भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.