महाड : मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीसांकडून नोटिसा | पुढारी

महाड : मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीसांकडून नोटिसा

महाड : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी शासनाला ४ मेपर्यंत  अंतरिम मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी. या उद्देशाने महाड पोलीस उपविभागाअंतर्गत महाड बिरवाडी व पोलादपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २० प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना १४९ कलमाअंतर्गत नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती महाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे .

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (दि.४) दुपारपर्यंत शासनाला मशिदीवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर संघटनेमार्फत मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसैनिक तसेच हिंदू समाजातील नागरिकांना आवाहन करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाड शहरातील १२ पोलादपूरमधील ५ व बिरवाडी एमआयडीसीमधील ३ प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना १४९ कलमाअंतर्गत नोटीस बजाविण्यात आली आहे.

या कलमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे नोटीशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर, महाड महिला आघाडी प्रमुख प्रतीक्षा कुलकर्णी, तेजस गांधी, पोलादपूर येथील दुर्वेश दरेकर यांच्यासह २० प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button