पुणे; हिरा सरवदे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीचा एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प किंवा कचरा डेपो नाही. त्यामुळे या गावांमधील कचर्याची भिस्त महापालिकेच्या प्रकल्पांवर अवलंबून आहे. दरम्यान, कचर्याची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून वाघोली येथील गायरान जमिनीवर कचरा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
राज्य शासनाने नुकतेच २३ गावांचा महापालिकेच्या हद्दीत समावेश केला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना मुलभूत सेवासुविधा देण्याचे दायित्व आता महापालिकेकडे आले आहे. या अनुषंगाने गावांमधील नागरिकांचा पिण्याचे पाणी आणि कचर्याचा प्रश्न प्राधान्य क्रमाने मार्गी लावण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
सध्या तरी ग्रामपंचायतीने तयार केलेली यंत्रणाच पाणी आणि कचर्यासाठी वापरली जात आहे. यावर नियंत्रण मात्र, महापालिकेच्या अधिकार्यांचे आहे.
समाविष्ट गावामध्ये स्वच्छतेसाठी झाडणकाम करणारे कर्मचारी आणि कचरा संकलित करणार्या वाहने आहेत. मात्र, समावेश झालेल्या एकाही गावामध्ये कचर्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प किंवा कचरा डेपो नाही. त्यामुळे या गावांमधून संकलित होणार्या कचर्याची भिस्त महापालिकेच्या विविध कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर आहे.
गावाची जबाबदारी ज्या क्षेत्रीय कार्यालयांवर देण्यात आली आहे. त्या क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरातील कचरा प्रकल्पात किंवा डंपींगच्या ठिकाणी कचरा पाठवला जातो.
खडकवासला, किरकटवाडी, कोंढवे धावडे, मांजरी बुद्रूक, नांदेड, न्यू कोपरे, नर्हे, पिसोळी, शेवाळवाडी, कोळेवाडी, वडाची वाडी, बावधन बुद्रूक, वाघोली, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, होळकरवाडी, औताडे, हांडेवाडी, नांदोशी, सूस, म्हाळुंगे या गावांचा समावेश पालिका हद्दीत समावेश झाला आहे.
समावेश झालेल्या २३ गावांपैकी वाघोली, मांजरी आणि नर्हे या तीन गावांमधून सर्वाधिक कचरा सध्या संकलित होतो.
या तीनही गावांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने या गावांमध्ये रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी ओढे किंवा नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण अधिक आहे.
या तीन गावांच्या तुलनेत इतर गावांमध्ये फारसा कचरा रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी दिसून येत नाही.
शहरात दिवसाला साधारण दोन- अडीच हजार टन कचरा संकलित होतो. पालिका हद्दीत नवीन २३ गावांचा समावेश झाल्याने संकलित होणार्या कचर्यात २०० ते ३०० टन कचर्याची भर पडली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांवरील ताण वाढला आहे.
कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी वाघोली सोडता एकाही गावात सपाट भागावर जागा उपलब्ध नाही.
वाघोली येथे दोन ठिकाणी गायरान जागा आहे. त्या जमिनीवर कचरा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आम्ही करत आहेत.
याबाबत लवकरच शासनाकडे जमिन हस्तांतरासाठी प्रस्तावला सादर केला जाणार असल्याचे उपायुक्त अजित देशमुख (घन कचरा व्यवस्थापन विभाग) यांनी सांगितले आहे.
आमच्या गावाचा महापालिकेत समावेश होण्यापूर्वी ग्रामपंचायत यंत्रणेची दररोज कचर्याची गाडी येत नव्हती किंवा दररोज झाडणकामेही केली जात नव्हती, मात्र, गावाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर काही दिवसानंतर गावात दररोज झाडणकाम केले जाते. कचरा संकलन करणार्या गाड्याही दररोज न चुकता येतात, अशी प्रतिक्रीया किरकटवाडी, खडकवासला, कोंढवे-धावडे, नांदेड या गावांमधील महिलांनी व्यक्त केल्या.
खडकवासला गावामध्ये कचरा संकलनासाठी सध्या दोन गाड्या कार्यरत आहेत. तर दोन्ही गाड्या नादुरुस्त असल्याने उभ्या आहेत.
संकलित केलेला कचरा कात्रज येथील डेपोत टाकला जातो. डेपोवर व प्रवासात वेळ जात असल्याने कचरा संकलनाचे कसलेच वेळापत्रक नाही.
सकाळी आठपासून सायंकाळी चारपर्यंत केव्हाही कचरा संकलनाची गाडी येऊ शकते, त्यामुळे महिलांना गाडीची वाट पहात बसावे लागते.
अनेकवेळा गाडीची वाट न पाहता घरातील कचरा रस्त्याच्या कडेला किंवा कालव्याच्या परिसरात टाकला जातो.
त्यामुळे कचरा संकलित करणार्या गाड्यांची वेळ निश्चित करावी. गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
नर्हे गावातील ओला आणि सुका कचरा संकलित करण्याचे काम लहान- मोठे टेम्पो दररोज करतात.
मात्र, सध्या असलेली यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांची शिल्लक राहिलेला भाजीपाला आणि घरगुती कचर्याच्या पिशव्या गावातील विविध रस्त्यांच्या कडेला व आडोशाला फेकून दिल्या जातात.
शहरातील निम्म्याहून अधिक घरांमध्ये जावून ओला व सुका कचरा संकलित करणारी 'स्वच्छ' सहकारी संस्था महापालिकेच्या मदतीला धावून आली आहे.
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी सर्वाधिक घनतेच्या मांजरी गावात दररोज निर्माण होणार्या सुमारे ४० टन कचर्यापैकी निम्म्याहून अधिक कचर्याचे विलगीकरण करण्याची विनंती महापालिकेने स्वच्छ संस्थेला केली होती.
या विनंतीवरून मागील दोन-तीन दिवसांपासून स्वच्छ संस्थेच्या कर्मचारी कचर्याचे विलगीकरण करण्याचे काम करत आहेत.
हेही वाचलंत का?