जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज शुक्रवारी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. मागील महिन्यात राज्यात आलेल्या महापुरादरम्यान कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले.
दोन्ही राज्यातील धरणांच्या सुयोग्य नियोजनामुळे बर्याच मोठ्याप्रमाणावर होऊ पाहणारी जीवित व वित्तहानी टळली. येणार्या काळातही दोन्ही राज्ये योग्य समन्वय साधतील, असा विश्वास ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकार्यांसमवेत यावेळी बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येत्या दि. 13 ते 20 ऑगस्टदरम्यान हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली, असे ना. पाटील यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रात पूर येण्याआधी महिन्याभरापूर्वीच ना. पाटील यांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या बैठकीत अलमट्टी धरणातून योग्य पाण्याचा विसर्ग करण्यावर एकमत झाले होते.