

जालंधर; पुढारी वृत्तसेवा : हॉर्न : हौसेपोटी अनेक लोक वाहनांचे 'मॉडिफिकेशन' करून घेत असतात. अशा अनेक भन्नाट 'मॉडिफाईड' गाड्या जगभर पाहायला मिळतात.
सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर असे काही 'हटके' प्रकार करून त्याच्या सहाय्याने प्रसिद्धी मिळवण्याचीही अनेकांना हौस असते. आता पंजाबच्या बंगा येथील एका तरुणाने आपल्या मोटारसायकलवर चक्क 48 हॉर्न लावून घेतले आहेत. अर्थातच पोलिसांनी त्याची ही मोटारसायकल जप्त केली आहे!
या तरुणाने सोशल मीडियातील सवंग प्रसिद्धीसाठीच हा नसता उपद्व्याप केला होता. तो आपली मोटारसायकल चालवत असतानाचे व्हिडीओ बनवत असे आणि ते सोशल मीडियात पोस्ट करी.
त्यामुळे लाईक्स आणि फॉलोअर्स वाढले की नाही हे गुलदस्त्यातच असले तरी त्याची मोटारसायकल मात्र पोलिसांनी जप्त केली.
हा तरुण आपली मोटारसायकल कधीही शहरात आणत नसे. तो आपल्या छोट्या गावातच ती फिरवत असे. जर मोटारसायकल शहरात आणली तर पोलिस त्याला दंड करणार हे त्याला माहिती होते. मात्र, तरीही आता त्याची मोटारसायकल पोलिस ठाण्यातच धूळखात पडली आहे!
त्यासाठी एका व्यक्तीने केलेली तक्रार कारणीभूत ठरली. हा तरुण बाईक चालवत असताना हे कर्कश हॉर्नही वाजवत असे. त्यामुळे त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली होती.
नववी पास शिक्षण असलेल्या या तरुणाने आपण फॉलोअर्स आणि लाईक्स वाढवण्यासाठी हा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने मोटारसायकलवर 33 हजार 600 रुपये खर्च केले होते. एक हॉर्नच 700 रुपयांना मिळतो. आता त्याच्या या दुचाकीपेक्षा हॉर्नचीच किंमत अधिक झाली आहे!