जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मित्रासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यावर पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल येथील बर्डी भागात ही हत्या झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विवाहितेचे वडील चमार दलसिंग बरेला (रा. गारबर्डी ) यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती साधू मानसिंग बारेला (वय 35, रा. पालबर्डी) व त्याचा मित्र भायला भंगा बारेला (पिंपळखुटा, ता. जि. खांडवा, मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. सायजाबाई बारेला (वय 30 वर्ष , रा. पालबर्डी) असे मयत महिलेचे नाव आहे.
काल रावेर तालुक्यातील पाल येथील बर्डी भागात आरोपी पतीच्या घरात मृतक, दोन्ही आरोपी घरीच दारू पित होते. या महिलेच्या पतीला त्याच्या मित्राने दारू आणण्यासाठी पैसे देऊन बाहेर पाठविले. त्यांच्या मुलीला 20 रुपये देऊन दुकानात गोळी/चॉकलेटसाठी पाठविले.
त्यानंतर दारू घेऊन आलेल्या पतीला मित्र आणि पत्नी आक्षेपार्ह अवस्थेत दिसले होते.
ते पाहून आरोपी पतीने पत्नीस काठीने हातावर, पायावर गंभीर मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. या दोन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम-302, 376, 452 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळून गेलेला आरोपी भायला बारेला याला पोलिसांनी पिंपलखुटा (ता. जि. खांडवा, मध्य प्रदेश) येथे जाऊन अटक केली आहे.
पुढील तपास पो. नि. रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक, पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख व वाघमारे, हे. कॉ. राजेंद्र राठोड, पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो. कॉ. सुरेश मेढे, प्रदीप सपकाळे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, मंदार पाटील, पुरुषोत्तम पाटील, श्रीराम कांगणे, नरेंद्र बाविस्कर, संदीप धनगर, अतुल तडवी, सचिन घुगे, कुणाल पाटील करीत आहेत.
हे ही वाचा :