

पुणे : पुणे महापालिकेसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भाजप पक्ष कोअर कमिटीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत आठही विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी चर्चा करून ४१ प्रभागातील काही उमेदवारांनी यादी तयार करण्यात आली असून, ही यादी मुंबईत प्रदेश कमिटी समोर ठेवण्यात येणार आहे.
त्या नावांवरती गुरुवारी (दि. २५) मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चर्चा करणार आहे. यानंतर फायनल यादी शुक्रवारी (दि. २६) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीत पक्षप्रवेशावरून झालेली आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.
महापालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. भाजपमार्फत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यासंदर्भात बुधवारी आपटे रस्त्यावरील एका बड्या हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूकप्रमुख गणेश बिडकर, आमदार सुनील कांबळे, भीमराव तापकीर आदी उपस्थित होते.
या बैठकीत विधानसभानिहाय प्रभागांवर चर्चा झाली. संबधित मतदारसंघातील आमदार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रभागनिहाय उमेदवारांची नावे मांडण्यात आली. ज्या नावांवर सर्वानुमते निर्णय झाला, त्यावर शिक्कामोर्तब करून पहिली यादी तयार करण्यात आली. तर ज्या नावांवर मतभेद होते, त्या नावांवरील अंतिम निर्णय प्रदेश नेते घेतील, असे ठरविण्यात आल्याचे समजते.
भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी तब्बल अडीच हजार इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व अडीच हजार इच्छुकांच्या मुलाखती देखील पार पडल्या आहेत. यातील निवडून येणाऱ्या उमेदवारांची यादी भाजपने तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. काही नावे अंतिम करण्यासाठी कोअर कमिटीतीत दुमत असल्याने त्यांची नावे मुंबईतील प्रदेश कोअर कमिटीला पाठवली जाणार आहे. या नावावर पक्षाचे वरिष्ठ अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. तर ज्या नावावर एकमत झाले आहे, ती यादी देखील प्रदेश कोअर कमिटीला पाठवण्यात येणार असून, त्यांची नावे अंतिम करून ती यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित नावांवर चर्चा करून दुसरी यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठांकडून देण्यात आली.
भाजपने पक्षाबाहेरील नेत्यांना प्रवेश दिल्यामुळे काही आमदार नाराज झाले आहेत. त्यांना विश्वासात न घेता हे पक्षप्रवेश झाल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्यात वादावादी झाली असल्याची माहिती आहे. अशा आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी कोअर कमिटीने प्रत्येक आमदारासोबत अर्धा ते एक तास स्वतंत्रपणे चर्चा केली. या चर्चेत प्रभागातील उमेदवारांबाबत मते जाणून घेत प्रत्येक प्रभागातील आमदारांची पसंती कोणत्या उमेदवाराला आहे, हे जाणून घेण्यात आले. दरम्यान अंतिम उमेदवारी यादी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फायनल करणार असल्याने या यादीबाबत उत्सूकता आहे.
मतदार संघनिहाय स्थानिक आमदारांकडून प्रत्येक प्रभागातून चार नावे मागविण्यात आली. या नावांची चर्चा बैठकीत करण्यात आली. यासह चौघांचे पॅनेल कसे तयार करावे, याची देखील बैठकीत चर्चा झाली आहे. ज्या प्रभागात भाजप उमेदवाराला परिस्थिती कठीण आहे, अशा ठिकाणी बाहेरचा उमेदवार आयात करण्यावर देखील चर्चा झाली. ज्या नावांवर मतभेद नाहीत किंवा एकमत आहे, अशा नावांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. प्रदेश कमिटीच्या बैठकीत त्यास मान्यता घेऊन या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. भाजपने प्रत्येक प्रभागात कोणता उमेदवार सक्षम आहे याची पाहणी केली असून, ती नावे प्रदेश कमिटीला पाठवली जाणार आहेत. उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवारी दिली जाणार आहे. जेथे उमेदवारीवरून मतभेद आहेत तेथील निर्णय प्रमुख नेते घेणार आहेत.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांसंदर्भात कोअर कमिटीची बैठक झाली. विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांची नावे शॉर्टलिस्ट करणे, युतीच्या जागेच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. याद्यांसंदर्भात दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या संदर्भात उद्या मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण निर्णय घेणार आहेत.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री व खासदार