

पुणे : राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेमध्ये पुण्याच्या गायत्री तांबवेकर हिने तीन सुवर्णपदक मिळवून मोलाची कामगिरी केली आहे.
रूद्रपूर उत्तराखंड येथे पार पडलेल्या ट्रॅक सायकलिंग मध्ये १४, १६, १८ आणि सिनिअर या वयोगटामध्ये जवळपास ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ७७ वी सिनिअर, ५४ वी ज्युनियर व ४० वी सब ज्युनियर राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंगमध्ये पुण्याच्या गायत्रीने ३ सुवर्णपदक मिळवत महाराष्ट्रासाठी हॅटट्रिक केली.
तिने टाइम ट्रायल प्रकारात १६ वर्षांखालील मुलींमध्ये ३९.१६८ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक, स्क्रॅच रेस प्रकारात सुवर्णपदक व टीम टाइम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. गायत्रीला महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव संजय साठे यांचे मोलाचे योगदान लाभले. गायत्री गेले नऊ वर्ष फिनिक्स सायकलिंग अॅकॅडमी पुणेचे प्रशिक्षक दर्शन बारगुजे यांच्याकडे सराव करते. गायत्री ही बाणेर येथील विबग्योर शाळेत नववी इयत्तेत शिकत आहे.