

पुणे : पुणेकरांची विशेष पसंती असलेल्या सुगंधी आंबेमोहर तांदळाच्या दरांनी नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच मोठी उसळी घेतली आहे. यंदा घाऊक बाजारात आंबेमोहर तांदळाचे दर प्रतिक्विंटल १२,००० ते १४,००० रुपयांदरम्यान सुरू झाले असून, ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २५ ते ३० टक्के आहे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही डिसेंबरच्या सुरुवातीलाच दरवाढीचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे.
नॉन-बासमती तांदळाच्या निर्यातीतील वाढ आणि उत्पादनात झालेली घट ही दरवाढीची प्रमुख कारणे असल्याचे जयराज अँड कंपनीचे संचालक व तांदळाचे निर्यातदार धवल शाह यांनी सांगितले. महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहर तांदळांपैकी सुमारे ८० टक्के तांदूळ मध्य प्रदेशातून, तर उर्वरित २० टक्के आंध्र प्रदेशातून येतो. यंदाया दोन्ही राज्यांमध्ये उत्पादन घटल्याने बाजारात आवक मर्यादित राहिली आहे. त्याचबरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केल्याने दर आणखी वाढले आहेत.
पूर्वी पुणे, मावळ, भोर आणि कामशेत पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर लागवड होणारा आंबेमोहर तांदूळ शहरीकरण, जमिनींचे वाढलेले भाव तसेच वर्षातून एकदाच येणारे पीक आणि जास्त कालावधी लागणारी लागवड, यामुळे महाराष्ट्रातून हळूहळू कमी होत आहे. आंबेमोहरच्या वाढत्या दरांमुळे पुणेकरांचा कल मावळ इंद्रायणी तांदळाकडे वळत असल्याचेही व्यापाऱ्यांनी नमूद केले. आंबेमोहरचे दर यंदा कमी होण्याची शक्यता अत्यल्प असल्याचा अंदाज ज्येष्ठ व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केला.