

खडकवासला : खडकवासला धरणाजवळील गोऱ्हे बुद्रुकमध्ये बुधवारी (दि. २४) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एका प्रवासी युवकाचा मृत्यू झाला, तर रिक्षाचालक व दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात रिक्षाचा संपूर्ण चुराडा झाला आहे.
याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, निष्काळजीपणाने डंपर चालवून अपघात केल्याच्या आरोपाखाली डंपरचालक नामदेव भाऊराव बाजगिरे (वय ४६, रा. धायरी फाटा) याला अटक केली आहे.
राहुल किशोर भट (वय २७, रा. हडपसर, पुणे) असे मयताचे नाव आहे. तर, दुसऱ्या गंभीर जखमी प्रवाशाचे नाव आरमान पिंटू भट (वय १८, रा. हडपसर) व गंभीर जखमी रिक्षाचालकाचे नाव दीपक त्रिलोकी राय (वय ४५, रा. धायरी) असे आहे.
घटनास्थळी हवेली पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागाचे अंमलदार अजय पाटसकर व पोलिस जवानांनी धाव घेतली. तोपर्यंत सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, जबर मार लागल्याने राहुलचा मृत्यू झाला.
हवेली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, सहाय्यक पोलिस फौजदार संतोष तोडकर, अंमलदार बी. डी. कांबळे, ए. एस. चांदगुडे यांच्या पथकाने डंपरचालकाला ताब्यात घेऊन अटक केली.
नामदेव राय यांच्या रिक्षामधून (एम एच १२, क्यू ई ४२८४) मधून मयत राहुल भट व त्याचा पुतण्या आरमान भट हे पुण्याहून गोऱ्हे बुद्रुकमधील एका हाॅटेलमध्ये लग्नासाठी चालले होते. खडकवासला धरणाच्या डाव्या तीरावर पुणे-पानशेत रस्त्यावर भारतीय लष्कराच्या डीआयडी संस्थेजवळ ग्रीन थंब गार्डनसमोर पुण्याकडे जाणाऱ्या डंपरने (एम एच १२ एक्स एम ९१९२) रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षासमोरील भागासह प्रवासी बसलेल्या भागाचा चुराडा झाला. चालकासह दोन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी मयत राहुल भट यांचा भाऊ चिंटू किशोर भट यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
हवेली पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागाचे अंमलदार अजय पाटसकर म्हणाले की, डंपरचालक नामदेव बाजगिरे यांनी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने डंपर चालवत समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामुळे अपघात झाला आहे.