

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तत्कालीन सचिव डॉ. सुवर्णा खरात यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. काही दिवसांपूर्वी या पदावर अवर जिल्हाधिकारी जगन्नाथ वीरकर यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला. अखेर सामान्य प्रशासन विभागाने महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची एमपीएससीच्या सचिवपदावर नियुक्ती केली. त्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी एमपीएससीला पूर्णवेळ सचिव मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एमपीएससीच्या काही परीक्षांचे निकाल पाच ते सहा महिन्यांपासून रखडले आहेत, तर काही निकाल जाहीर झालेल्या परीक्षांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे उमेदवार सातत्याने आयोगाकडे विचारणा करत असूनही आयोगाकडून कोणतेही उत्तर स्पर्धा परीक्षार्थींना मिळत नव्हते. राज्य सरकार आणि आयोगाच्या अशा ढिसाळपणामुळे स्पर्धा परीक्षार्थींचे प्रचंड नुकसात होत असल्याची ओरड स्पर्धा परीक्षार्थी करत होते. अखेर आयोगाने महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची सचिवपदावर निवड केली. त्यामुळे पुढील काळात आयोगाच्या जाहिराती, परीक्षा, निकाल, मुलाखती आणि नियुक्त्या दिलेल्या मुदतीत होतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाद्वारे महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची २ वर्षांच्या कालावधीसाठी सचिवपदी नियुक्ती केली आहे. महेंद्र उत्तमराव हरपाळकर आणि सहसचिव हे ज्या तारखेला प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू होतील, त्या तारखेपासून प्रतिनियुक्तीच्या सेवेचा प्रारंभ होईल. तसेच ती सेवा ज्या तारखेला ते आपल्या शासकीय पदाचा कार्यभार पुन्हा स्वीकारतील, त्या तारखेला समाप्त होईल, असे कळवण्यात आले आहे.
'एमपीएससी' ही घटनात्मक संस्था असून, यामध्ये अध्यक्ष आणि सचिव ही महत्त्वाची पदे आहे. आयोगाच्या परीक्षा, निकाल, शिफारसी, न्यायालयीन प्रकरणे, नवीन नियमावली लागू करणे आदी सर्व जबाबदाऱ्या या सचिवांकडे असतात. तसेच सचिव हे कार्यालयीन प्रमुखही असतात. परंतु राज्य सरकारमधील अधिकारी सचिवपदाची जबाबदारी घ्यायला उत्सुक नसल्याने दोन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. या सर्वांचा परिणाम 'एमपीएससी'मधील विविध परीक्षा आणि निकालांवर झाला होता. अखेर सचिवपदावर झालेल्या नियुक्तीमुळे सर्व गोष्टींना वेग येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.