

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेने वंचित, उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, महाराष्ट्राच्या जडणघडणीत बार्टीचे योगदान प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेचा 47 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला, त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. या प्रसंगी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विभागप्रमुख अनिल कारंडे, रवींद्र कदम, शुभांगी पाटील, विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, लेखाधिकारी नितीन चव्हाण यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मुंढे म्हणाल्या की, बार्टी ही संस्था अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्याचा फायदा अनेकांना होत आहे. तसेच पुढील काळातही या संस्थेचे कार्य आणखी तळागाळात पोहचावे, हीच अपेक्षा.
या प्रसंगी महासंचालक वारे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महापुरुष होते. त्यांनी संविधाननिर्मितीसाठी मोठा संघर्ष केला, त्यामुळेच या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान मिळाले, त्यामुळेच या देशातील कोट्यवधी लोकांचा आधार झाला. त्यांचे विचार आपण आचरणात आणावे. त्यांच्या नावाने ही संस्था उभी आहे. या संस्थेचा लौकिक सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी संस्थेच्या विविध योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी चांगले काम करणार्या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्या अधिकारी-कर्मचार्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बार्टीच्या अधिकारी व कर्मचार्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात बुद्ध -भीमगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार व सेवा विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी केले. सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी केले.