पुणे : पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षेचा पेपर फोडून तो 20 जणांना पुरवून त्यांच्याकडून 1 कोटी रुपये कमावण्याचा डाव बोटले-बडगिरे जोडीने आखला होता. मिळालेल्या पैशांतून दोघांनी प्रत्येकी 50 लाख रुपये वाटून घेण्याचे ठरविले होते. मात्र, त्यांनी ज्यांना हा पेपर पुरविला त्यांनी तो अनेकांपर्यंत पोहच केला. त्यातून तो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने पेपरफुटीचे हे बिंग बाहेर पडल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी सहसंचालक महेश बोटलेला गुरुवारी न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी त्याला 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे.
सायबर पोलिसांनी बोटलेला बुधवारी रात्री अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात हा पेपर कसा फोडला व त्यातून ते कशी कमाई करणार होते, हे पुढे आले आहे. बोटलेकडून त्याचा मोबाईल, लॅपटॉप, त्याच्या कार्यालयातील वापरातील संगणकाची हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह व सीसीटीव्ही स्टोअरेजसह डीव्हीआर आदी साधने तपासासाठी जप्त करण्यात आली आहेत.
महेश बोटले हा गट 'क' व गट 'ड' या पदाच्या भरतीसाठी असलेल्या लेखी परीक्षा पेपर समितीचा सदस्य आहे. बोटलेने गट 'क' व गट 'ड' हे दोन्ही पेपर पेनड्राईव्हमध्ये दिले होते. गट 'ड'शिवाय इतर गटाच्या भरती परीक्षेत आणखी कोणत्या एजंटांना त्या परीक्षेचे पेपर दिले आहेत का, याचा तपास केला जाणार आहे. इतर कोणकोणत्या पदाच्या भरती परीक्षेसाठी बनविलेल्या समितीत त्याचा समावेश होता; तसेच इतर कोणती जबाबदारी दिलेली होती, त्या जबाबदारीदरम्यान त्याने स्वत:च्या फायद्यासाठी किती प्रकरणात उपयोग केला, याचा तपास करायचा असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी न्यायालयात सांगितले.
हेही वाचा