जळगाव : निलंबन झाल्‍याने एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

जळगाव : निलंबन झाल्‍याने एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या एक महिन्यापासून संप सुरू आहे. या संपात सहभागी असलेल्या रावेर डेपोतील बस चालकाला निलंबित करण्यात आले होते. यामुळे (गुरूवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या चालकाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांच्या सावधगिरीमुळे त्याचे प्राण वाचले.

रावेर तालुक्यातील तांदळवाडी येथील रहिवासी राहुल विश्वनाथ कोडी (वय 35) हा रावेर डेपोमध्ये बस चालक आहे. गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या संपामध्ये तोही सहभागी झालेला आहे. संपात सहभाग घेतल्‍याच्या कारणातून त्याला (गुरूवार) निलंबित करण्यात आल्याचे पत्र मिळाले होते. एकीकडे संप सुरू आहे, तर दुसरीकडे निलंबनाची कारवाई यामुळे नैराश्‍य आलेल्या कोंडीने गुरूवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास काहीतरी विषारी औषध प्राशन केले.

औषध प्राशन केले असल्याने तो कोसळला. डेपो मॅनेजर जीप जंजाळ, वनकर्मचारी कंडक्टर, ड्रायव्हर यांनी त्याला खाली बसलेले पाहून तात्काळ रायगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी उपचार करून सावदा येथील खासगी रुग्णालयात त्याला भरती करण्यात आलेले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

Back to top button