पुणे : ज्ञानेश्वर भोंडे : गुणवत्तेच्या जोरावर पदभरतीसाठी आयुष्य पणाला लावणार्या स्पर्धा परीक्षार्थींच्या स्वप्नांना सुरूंग लावण्याचे काम आरोग्य विभागातीलच अधिकार्यांनी मिळून-मिसळून केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागात 'कुंपणानेच शेत खाल्ल्याचे' स्पष्ट झाले आहे.
विभागाच्या गट 'ड'च्या पेपरफुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात आरोग्य विभागातील दोन 'मोठे मासे' गळाला लागले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मुंबईतील सहसंचालकपदावरील महेश बोटले आणि लातूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील प्रशांत बडगिरे या दोन मित्रांना अटक झाली. बोटलेकडे केवळ गट 'ड' नव्हे, तर गट 'क'च्या परीक्षांचीही जबाबदारी होती. म्हणून या दोन्ही परीक्षेत, तसेच याआधीच्या परीक्षांतही बोटलेने प्रचंड संपत्ती लाटल्याची चर्चा आरोग्य खात्यात रंगली आहे.
बोटलेची सुरुवातच मुळात प्रशासकीय अधिकारी म्हणून झाली. याआधी तो आरोग्य खाते वगळता दुसर्या खात्यात होता. मुंबईतील आरोग्य संचालनालयात येण्यापूर्वी बोटलेने ठाण्यातील आरोग्य सर्कलच्या कार्यालयात काम केले. त्याआधी लातूरच्या उपसंचालक कार्यालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. त्या वेळी तेथे प्रशांत बडगिरेसोबत ओळख झाली आणि तेथूनच डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी बदली प्रकरणात त्यांनी 'मलिदा' लाटला. तेथूनच त्यांनी हा उद्योग सुरू ठेवला.
सहसंचालक महेश बोटलेला आरोग्य खात्याच्या महत्त्वाच्या जबाबदार्या दिल्या जात होत्या. आता गट 'क' आणि गट 'ड' परीक्षेतही पेपर सेट करण्याच्या समितीत त्याचा समावेश झाला हेाता. मात्र, त्याने तो पेपर स्वतःच्या संगणकात ठेवला आणि नंतर बडगिरेमार्फत परीक्षार्थींना पुरवला. त्याबदल्यात लाखोंची माया कमावली. मात्र, त्याद्वारे बोटलेने नेमके किती लाटले, हे अद्याप पोलिसांच्या चौकशीतून समोर यायचे आहे.
आरोग्य खात्याच्या दोन्ही परीक्षा पहिल्यापासूनच वादग्रस्त ठरल्या होत्या. तरीही त्यासाठी लाखोंची बोली लागत होती. ग्रामीण भागात तर गट 'क' आणि गट 'ड' परीक्षेआधी पेपर पुरविण्यासाठी सर्रासपणे 7 ते 8 लाख रुपयांची बोली लागत होती. याचा अर्थ हा संपूर्ण पूर्वनियोजित कट बोटलेचा होता. पेपर मिळणार, याची खात्री असल्यानेच ही लाखांची उड्डाणे घेतली जात असल्याचे या प्रकरणावरून लक्षात येते. बडगिरे याआधी पुणे जिल्हा परिषदेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कामाला होता. येथून तो लातूरच्या उपसंचालक कार्यालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झाला.
कित्येक वर्षांनी आरोग्य खात्यात जंबो भरती निघाली होती. त्याकडे रात्रंदिवस डोळे लावून आणि आपल्याला काहीतरी नोकरी मिळेल, या आशेने हजारो परीक्षार्थी रात्रीचा दिवस करून अभ्यास करीत होते. मात्र, या परीक्षार्थींचा विश्वासघात करताना स्वार्थी बोटलेला किंचितही काही वाटले नाही. पुणे पोलिसांनी शेवटच्या साखळीपर्यंत शोध घेत अखेर त्याला जगासमोर आणले. बोटलेला हजारो मुलांचा तळतळाट लागल्याचे परीक्षार्थी मुले सांगत आहेत, पोलिसांचे आभारही मानत आहेत.
यामध्ये केवळ बोटले आणि बडगिरे यांना व इतरांनाच दोष देऊन उपयोग नाही. ज्यांनी-ज्यांनी पैसे दिले आणि पेपर मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यांचीही नावे जाहीर करून त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे निदान इथून पुढे तरी परीक्षेबाबत असे देणे आणि घेणे होणार नाही, अशी मागणी परीक्षार्थींकडून होत आहे.