पुणे : पुढारी वृत्तसेवा : ओमायक्रॉनच्या भीतीने शहरातील हॉटेल्स परदेशातून पुण्यात आलेल्यांना आणि कोरोनाबाधित नागरिकांना रूम देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या परदेशवारी करणार्या प्रवाशांना येथे आल्यावर ते जर पॉझिटिव्ह आढळले, तर त्यांना सक्तीने महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करावे लागणार आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत महापालिकेने अनेक हॉटेल्स ताब्यात घेतले होते आणि त्या ठिकाणी परदेशातून प्रवास करून आलेल्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, त्याचा सर्व खर्च त्यांनाच करणे बंधनकारक होते. मात्र, आता खासगी हॉटेल यासाठी तयार नाहीत. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या सीसीसी सेंटरमध्ये राहावे लागणार आहे.
'ओमायक्रॉन'च्या भीतीने महापालिका हद्दीत हॉटेल मिळत नाहीत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे परदेशातून आलेल्या व पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना 'कोविड केअर सेंटर'मध्येच दाखल करावे लागणार आहे. दुसर्या लाटेवेळी लॉकडाउनच असल्याने हॉटेल व्यवसाय बंद होता. ज्या ठिकाणी लॉजिंग-बोर्डिंग होते, त्या हॉटेलचालकांनी मेन्टेनन्सचा खर्च निघावा, यासाठी संपूर्ण हॉटेल क्वारंटाइन सेंटर केले होते. त्या ठिकाणी राहण्याशिवाय खानपान सेवेचे पैसेही आकारले होते.
दरम्यान, पुण्यात 'ओमायक्रॉन' पॉझिटिव्ह निघालेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णाला अलगीकरण करण्यासाठी हॉटेल शोधण्याला महापालिकेला मोठी कसरत करावी लागली. अखेर आयुक्तांना यामध्ये लक्ष घालावे लागले आणि त्याला एक रूम मिळाली. परंतु
सद्य:स्थितीत संपूर्ण हॉटेलच क्वारंटाइन सेंटरसाठी द्यायला हॉटेलचालक नकार देत आहेत.
हेही वाचा