भाजपाने ओबीसी आरक्षण बुडवण्याच्या पापाचे प्रायश्चित घ्यावे : नाना पटोले | पुढारी

भाजपाने ओबीसी आरक्षण बुडवण्याच्या पापाचे प्रायश्चित घ्यावे : नाना पटोले

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
भाजपाने २०१७ मध्ये ओबीसी आरक्षणाविरोधात कारस्थान करण्याचे पाप केले. त्याचे प्रायश्चित घेत भाजपाने जनतेची माफी मागून आरक्षणाची दारे उघडावी, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केले. ही आरोप प्रत्यारोपाची वेळ नाही. ओबीसींच्या संवैधानिक अधिकाराची लढाई आहे. त्यात राजकारण करू नये, असेही ते म्‍हणाले.

भाजपाने केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मागवून तातडीने सर्वोच्च न्यायालयाला द्यावा आणि ओबीसी आरक्षण बुडवण्याच्या पापाचे प्रायश्चित घ्यावे, असे पटोले यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण असताना त्यांना एवढे महागडे वकील कोणी लावून दिले हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे भाजपाने या फंदात न पडता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, असे आवाहनही त्‍यांनी केले.

भाजप याप्रश्‍नी दिशाभूल करीत आहे. इतर कोणत्याही राज्यात ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आलेले नसताना फक्त राज्यातच आव्हान कसे देण्यात येते, हे जनतेलाही माहिती आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली. आम्ही १३ डिसेंबरला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे ते म्हणाले.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button