Pune Porsche crash : ..आणि अतिक्रमण काढण्यासाठी जावे लागले दोन बळी | पुढारी

Pune Porsche crash : ..आणि अतिक्रमण काढण्यासाठी जावे लागले दोन बळी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बहुसंख्य पब आणि बार राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने महापालिकेकडून केल्या जाणार्‍या कारवाईला खोडा बसत असल्याचे समोर आले आहे. अखेर दोन बळी गेल्यानंतर शहरातील, त्यात प्रामुख्याने कोरेगाव पार्क व मुंढवा परिसरातील अनधिकृत पबवर कारवाईचा हातोडा पडला. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरात पब, रुफ टफ हॉटेल आणि हुक्का पार्लर यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा, कल्याणीनगर, खराडी, विमाननगर, बाणेर या परिसरात मोठ्या प्रमाणात पब आणि बार आहेत.

यामधील धक्कादायक बाब म्हणजे बोटावर मोजणे इतके पब आणि हॉटेल सोडले, तर उर्वरित सर्व अनधिकृतपणे सुरू असल्याचे वेळोवेळी समोरही आले आहे. महापालिकेने दिलेल्या परवानगीशिवाय इमारतींच्या साईड मार्जिंनमध्ये शेड मारून हे पब आणि बार थाटले गेलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या वेळा धुडकावून रात्री उशिरापर्यंत हे पब सुरू राहतात. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्याचा उपद्रव होतो. पार्किंग, ध्वनिप्रदूषण यासंदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येतात. याची दखल घेऊन महापालिकेकडून वारंवार कारवाई केली जाते.

मात्र, बहुसंख्य पब, बार, टेरेसवरील

हॉटेल राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. महापालिकेचे पथ कारवाईसाठी गेल्यानंतर राजकीय नेत्यांच्या फोन येतात, दबाव टाकला जातो. त्यामुळे अर्धवटच कारवाई होते आणि पुन्हा कारवाई झालेला भाग ‘जैसे थे’ करून व्यवसाय सुरू होतात. कल्याणीनगर येथील बॉलआर पबसमोर रविवारी मध्यरात्री बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा व एका तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील पब आणि रुफ टॉप हॉटेलचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पबवर आणि टेरेसवरील हॉटेलवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

…अखेर त्यांच्यावर कारवाई झाली

कोरेगाव पार्क परिसरातील वॉटर्स, ओरिला या बहुचर्चित पबसह काही बार व हॉटेलवर महापालिकेने कारवाई करून त्यांचे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले. यामधील काही पब राज्यातील बड्या नेत्यांशी संबंधित असल्याची चर्चा आहे. या पबवर यापूर्वी महापालिकेची यंत्रणा कारवाईसाठी गेली होती. मात्र, राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या नेत्याने ती कारवाई करण्यासाठी प्रशासनाला रोखले असल्याची माहिती तत्कालीन अधिकार्‍यांनी दिली. तसेच बुधवारी या पबवरील कारवाई दरम्यानही काही राजकीय बड्या नेत्यांनी ती रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले.

धक्कादायक म्हणजे शहरातील एक नामांकित पब विरोधी पक्षातील पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याच्या जवळच्या नातेवाइकाचा असल्याचे सांगितले जाते. त्याविरोधात अनेकदा नियमांच्या उल्लंघणाच्या तक्रारी पोलिसांकडे झालेल्या आहेत. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे त्यांना अभय मिळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, रविवारी कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर अखेर या अनधिकृत पब, हॉटेल यांच्यावर कारवाईचा हातोडा पडला. मात्र, त्यासाठी प्रशासनाला दोन बळी जाण्याची वाट पाहावी लागली, ही खर्‍या अर्थाने शोकांतिका ठरली आहे.

हेही वाचा

Back to top button