आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत बिबट्यांचे हल्ले वाढले : सरकार आणि वन विभाग सुस्त | पुढारी

आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत बिबट्यांचे हल्ले वाढले : सरकार आणि वन विभाग सुस्त

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मानवावर हल्ले वाढले असताना वन विभाग मात्र सुस्त आहे. सरकार आणि वन विभागाला माणसापेक्षा बिबटे महत्त्वाचे असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. गेल्या दोन दिवसात जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असतानाही राजकीय नेते मात्र निवडणुकीत व्यस्त आहेत. तर जनता बिबट्यांच्या भयामुळे त्रस्त झाली आहे. बिबट्यांच्या उपद्रवामुळे आणि भीतीमुळे शेती कामांवर परिणाम झाल्याचे दिसून येते.आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील बिबट्यांचे हल्ले रोखण्याबाबत वन विभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी, नागरिकांकडून केली जात आहे.

आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण क्षेत्र व अन्न, पाणी मोठया प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी रात्री दिसणारे बिबटे आता दिवसाही दिसू लागले आहेत. बिबटे शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मानवावर देखील हल्ले वाढले आहेत. आंबेगाव तालुक्यात मेंढपाळ कुटुंबावर, तसेच दुचाकीचालक, महिलांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. जुन्नर तालुक्यात नुकतेच बिबट्याने तिघांवर हल्ला केला. यामध्ये आठ वर्षीय मुलासह एका शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला. वारंवार हल्ले होऊनही वनविभाग ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे सरकार व वनविभागाला माणसापेक्षा बिबटे महत्त्वाचे आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

शेती पिकांना पाणी देणे झाले अवघड

आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात साखर कारखाने असल्याने उसाचे क्षेत्र मोठे आहे. दिवसा वीज नसल्याने रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागते. मात्र, आता बिबट्या ऊसाच्या क्षेत्राबरोबर बाजरी, मका, कडवळ या पिकांमध्येही दिसतो. त्यामुळे शेती पिकांना रात्री पाणी देताना भीती वाटते. अनेकदा पहाटे तसेच सायंकाळी बिबट्याचे दर्शन होत असल्याने नक्की कुठल्या वेळेत शेती पिकांना पाणी द्यावे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

घराघरांत जनजागृती होणे गरजेचे

बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत वनविभाग जनजागृती करत आहे. मात्र, बिबट्याबाबत काय काळजी घ्यावी हे अजूनही अनेक कुटुंबांना माहिती नाही. त्यामुळे वनविभागाच्या माध्यमातून रानावनात, वाडीवस्तीवर राहणार्‍या प्रत्येक कुटुंबाच्या घरोघरी जाऊन बिबटे प्राण्याबाबत
काय काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी द्या : शेरकर

नारायणगाव : गेले आठ दिवसांपासून जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचे मानवावर होणारे हल्ले वाढले आहेत. असे हल्ले वाढू शकतात. त्यामुळे पकडलेल्या बिबट्यांना सरसकट गोळ्या घालण्याची शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केली आहे. पिंपरी पेंढार येथे बाजरी पिकाची राखण करीत असलेल्या महिलेला बिबट्याने शुक्रवारी (दि. 10) सकाळी ठार केले. याबाबतची माहिती समजताच शेरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांना खडे बोल सुनावले. तसेच वन विभाग आणखी किती लोकांचे बळी घेणार आहे? असा सवाल केला. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. बिबट्याला तत्काळ गोळ्या घालण्याचे आदेश द्या, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा

Back to top button