आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष; बारामतीत जोरदार चुरस | पुढारी

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष; बारामतीत जोरदार चुरस

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून या निवडणुका गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी तयारी केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू होण्याची चिन्हे आहेत. बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व निवडणुका ताकदीने लढण्याचे संकेत लोकसभा निवडणुकीतून मिळाले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकहाती सत्ता आहे. सर्व प्रमुख संस्था पर्यायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असल्याने त्यांच्याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. याउलट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे मातब्बर पदाधिकारी नाहीत. मात्र, सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात त्यांना यश आले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांची नवीन फळी तयार झाल्याने त्यांच्याकडे नवीन नेतृत्व करण्याची संधी तरुणांना आहे. याअगोदर प्रमुख पदाधिकारी अजित पवार यांच्या गटाकडे होते. अजित पवार यांची तालुक्यावर एकहाती सत्ता असल्याने ते जो उमेदवार देतील तोच उमेदवार निवडून आणण्यात त्यांना आतापर्यंत यश आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतील चुरस पाहता येणार्‍या सर्व निवडणुका तुल्यबळ होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा

Back to top button